नवी दिल्ली : आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असे विधान अभिनेता राहुल सोलापूरकर याने केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल सोलापूरकरच्या विधानानंतर राज्यातील शिवप्रेमींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच संतापले आहेत. त्यामुळे शिवरायांबाबत असे विधान करणाऱ्या सोलापूरकरला दिसेल तिथे ठेचून काढावे, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. राहुल सोलापूरकरसारख्यांच्या जिभा हासडल्या पाहिजेत, असेही खासदार उदयनराजेंकडून सांगण्यात आले आहे. उदयनराजेंनी आज बुधवारी (ता. 05 फेब्रुवारी) यांनी पत्रकार परिषद घेऊन अभिनेता राहुल सोलापूरकरविरोधात संताप व्यक्त केला. (Udayanraje Bhosale angry on Rahul Solapurkar statement against Chhatrapati Shivaji Maharaj)
खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत अभिनेता राहुल सोलापूरकरविरोधात हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार मांडला. लोकशाहीत आपण वावरतो त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. त्यांनी कधी स्वत:चा स्वार्थ पाहिला नाही. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना आपले कुटुंब मानले. त्यांनी कधी तत्वाशी तडजोड केली नाही. पण असे असतानाही अनेकजण त्यांच्याबद्दल अशी गलिच्छं विधाने करत आहेत. टीव्हीवर ते पाहत असताना मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना झाल्या. पण हा सोलापूरकर आहे कोण? असा सवालच यावेळी उदयनराजेंनी विचारत सोलापूरकर याच्यावर निशाणा साधला.
हा सोलापूरकर कोण आहे? त्याने लाच घेतल्याबद्दल म्हटले. पण जे लाच घेतात, त्यांना त्यापलिकडे काहीच सूचच नाही. असे बोलताना जिभेला हाड नसते माहीत आहे. लावली जीभ टाळ्याला अन् काहीही बोलायचे. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्या लोकांना दिसेल तिथे ठेचले पाहिजे. वेचून ठेचले पाहिजे, असे म्हणत उदयनराजेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या विकृतीची वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जातीधर्मात अशा विकृतांमुळे तेढ निर्माण होतो, असेही यावेळी खासदार उदयनराजेंकडून सांगण्यात आले.
तसेच, याआधी सुद्धा आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे अशी विधाने करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे अशी विधाने करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाहीत, तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधाने करणार्यांना थांबवलं पाहिजे. त्यांचे सिनेमे बंद केले पाहिजे. निर्माते, दिग्दर्शकांनीही अशा लोकांनाही थारा देऊ नये. या लोकांना गाडले पाहिजे. त्यांना गाडले नाही तर देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. कठोर शब्दात मी निषेध करतो. मला विचारले तर त्याला गोळ्या घालून मारले पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे जे लोकं असतील त्या सर्वांना गोळ्या घातल्या पाहिजे. कुणीही बेताल विधाने करायचे. जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराज पुढे गेले. अशा महापुरुषांबद्दल अशी विधाने होत असतील तर दुसरा काही पर्याय नाही. तो जिथे दिसेल त्याचा ठेचा आणि गाडा, असा संताप राजेंनी व्यक्त केला.