घरमहाराष्ट्रउमेदवारीला विरोध असला तरी मी लोकसभेसाठी इच्छुक - उदयनराजे भोसले

उमेदवारीला विरोध असला तरी मी लोकसभेसाठी इच्छुक – उदयनराजे भोसले

Subscribe

शरद पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले असले तरी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

“माझ्या उमेदवारीला विरोध झाला तरी मी सातारा मधून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे. फोन वरून मी माहिती घेतली, मला काही जणांनी विरोध केला आहे. पण अनेकांनी समर्थन पण दिले आहे.”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरू आहेत. लोकसभा २०१४ निवडणुकित राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले खासदार उदयनराजे भोसले यांच्या मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली.

उदयनराजे यांच्याऐवजी श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीकडून तिकिट दिले जावे, अशी मागणी रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे आदी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी केल्याचे समजते. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख सर्व नेत्यांचा विरोध असतानाही उदयनराजे भोसले आज बैठकी नंतर राष्ट्रवादी कार्यालयात पोहोचले. ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे आपल्याला येण्यास उशीरा झाला असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

- Advertisement -

“माझ्या मतदारसंघात माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे सांगत उदयनराजेंनी पक्षातील विरोधकांना कोपरखळी मारली. शरद पवार साहेबांनी मतदार संघाचा आढावा घेतला आहे. साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. जसे पवार साहेबांचे अन्य पक्षात मित्र आहेत, तसेच अन्य पक्षात माझेही मित्र आहेत, असे सूचक वक्तव्य उदयनराजेंनी केले आहे.

उदयनराजेंना विरोध नाही – सुप्रिया सुळे

आजची बैठक उदयनराजे यांच्यावर केंद्रित झाली होती. पत्रकारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारले असते त्या चांगल्याच चिडल्या. खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध नाही. काही कार्यकर्ते चुकीच्या बातम्या पेरत आहेत. पत्रकारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.

- Advertisement -

माढातून प्रभाकर देशमूख?

यावेळी माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते यांच्यासोबत रामराजे निंबाळकर, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. या चर्चेवेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख देखील उपस्थित होते. देशमुख यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी बैठकीत पुढे आली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला हव्यात दोन जागा

मुंबईतून लोकसभेसाठी दोन जागा लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक आहे. काँग्रेसकडे एका अतिरिक्त जागेची मागणी करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. ईशान्य मुबंई बरोबर उत्तर मध्य मुंबई किंवा उत्तर पश्चिम मुंबई यापैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. काँग्रेसकडून उत्तर पश्चिम या मतादार संघातून गुरुदास कामत उमेदवार होते. तर उत्तर मध्य मतदारसंघातून प्रिया दत्त गेल्यावेळेस उमेदवार होत्या. या दोन्ही जागा परंपरागत काँग्रेसकडे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -