उद्धव, आदित्य फक्त वैचारिक विरोधक; कटुता संपवण्याकडे देवेंद्र फडणवीस यांचे पाऊल

संग्रहित छायाचित्र

अहमदनगर – देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे अजूनही चांगले संबंध आहेत, असे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्यावर आदित्य यांचे म्हणणे सत्य आहे. उद्धव ठाकरे असो की आदित्य ठाकरे आम्ही वैचारिक विरोधक आहोत. आम्ही एकमेकांचे शत्रू बिलकूल नाही, हे मी अनेक कार्यक्रमांत सांगितले आहे. राजकारणात कधीच कोणी कुणाचा शत्रू नसतो. फक्त वैचारिक विरोधक असतात. उद्धव यांनी वेगळी वाट पकडली आणि मी वेगळ्या वाटेला गेलो. सध्या महाराष्ट्रात खूप कटुता आली आहे. ही कटुता हळूहळू संपायला हवी, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केले.

एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कुठलीही कटुता नाही. माझे मन साफ आहे. आमच्या घरात असेच वातावरण आहे. आमच्यावर अनेक जणांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, मात्र आम्ही तशा प्रकारची टीका कधीच केलेली नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते हे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी कटुता संपवण्याकडे पहिले पाऊल टाकले होते.

शरद पवारांच्या प्रत्युत्तरावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हळूहळू सर्व गौप्यस्फोट बाहेर येत आहेत. मी जे बोललो तेच कसे खरे होते हे तुम्हाला हळूहळू समजत आहे, मात्र सध्या तुम्हाला अर्धेच समजलेले आहे. अर्धे समजायला अद्याप वेळ आहे, तर राष्ट्रवादीच्या बॅनरबाजीवर बोलताना मी माझ्या अनुभवातून शिकलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कुणाला वाटले होते का? ते बनले. त्यामुळे ज्याला ज्याला जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा देतो.