घरमहाराष्ट्रउद्धव बाळ ठाकरे मुख्‍यमंत्री

उद्धव बाळ ठाकरे मुख्‍यमंत्री

Subscribe

२८ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर शपथविधी, महाराष्‍ट्र विकास आघाडीच्‍या नेतेपदी निवड, तीनही पक्षांकडून सत्तास्‍थापनेसाठी दावा

दिवसभराच्या राजकीय नाट्यपूर्ण घडामोडींनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. बीकेसीतील ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी उशिरा आयोजित केलेल्या तिन्ही पक्षांच्या आमदार आणि नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले. शिवरायांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया. आम्ही कोणाशी सूडबुद्धीने वागणार नाही, मात्र आडवे कोणी आले तर त्याला सोडणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. उद्धव यांचा मुख्यमंत्री म्हणून २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर शपथविधी होईल.

- Advertisement -

हॉटेल ट्रायडंटमध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असावेत. असा ठराव मांडला. हा ठराव शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांकडून एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, समाजवादी पक्षाचे प्रमुख अबू आझमी आदी नेते उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ३० वर्ष आम्ही ज्यांच्यासोबत मैत्री ठेवली त्या मित्रांनी विश्वास ठेवला नाही. पण ज्यांच्याशी ३० वर्षे सामना केला, ते राजकीय विरोधक माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. मी सर्वांना धन्यवाद देतो. विशेषत: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही धन्यवाद द्यायचे आहे. कारण तीन टोकाचे तीन लोक एकत्र येत आहेत. पण एक वेगळी दिशा देशाला देण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. हे जे सरकार आपण बनवणार आहोत, किंबहुना बनलेले आहे, मला नाही वाटत, एवढे ज्येष्ठ नेते या आधीच्या सरकारमध्ये राहिलेले असतील, माझे सरकार म्हणजे आपल्या सर्वांचे सरकार हे कुणाशीही सुडाने वागणार नाही. मला आपल्या सगळ्यांच्या साथीची, सोबतीची, सहकार्याची गरज आहे. शेतकर्‍यांच्या डोळ्यातले अश्रू मला पुसायचे आहेत. राज्याला नवी दिशा देणारी ही आघाडी आहे. महाराष्ट्र विकासआघाडी ही राज्याच्या हितासाठी असणार आहे. शेतकरी शेतमजूरांसाठी ही महाराष्ट्र विकास आघाडी असेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मी देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद ऐकली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नाही. शिवसेनेने सोनिया गांधीची लाचारी पत्करली अशा अनेक टीका केल्या. पण मी मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो. त्यांच्यावर बोलण्यासाठी कोणत्याही मैदानात कोणत्याही ठिकाणी मी बोलायला तयार आहे. मी घाबरणारा नाही. तर लढणारा नेता आहे. खोटेपणा हा माझ्या हिंदुत्वामध्ये नाही. आम्ही कधीही मातोश्रीबाहेर पडलो नाही असेही ते बोलले. मी त्याचं उत्तर देईन. पण जे मातोश्रीवर आले आणि बाहेर जाऊन खोटे बोलतात. त्यांची साथ मी कदापी देणार नाही. ज्या वेळेला मी संघर्षात असतो तेव्हा मला नेहमी विचारले जाते की संघर्षात तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते का? मला संघर्षात नाही पण संघर्षात विजय मिळविल्यानंतर मला बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेब म्हणायचे, उद्धव विचार करुन शब्द दे. एकदा शब्द दिला की प्राण गेला तरी बेहत्तर, दिलेला शब्द पाडायचा नाही अशी आठवणी उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितली.

आपण सर्वांनी विचारपूर्वक माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, असे मी मानतो. आता हे आपले सरकार आहे. त्यामुळे हमरीतुमरी करायची नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला अनेक खिळे, काटे असतात. जाणारे मुख्यमंत्री अजून दोन खिळे ठोकून जातात. पण माझ्याकडे हातोडे आहेत. ते हे खिळे आत बसवतील. सरकार स्थापन झाल्यावर मी दिल्लीत माझ्या मोठ्या भावाला भेटायला जाणारच आहे, अशी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता कोपरखळी मारली.

भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, असे काही ठरलेच नव्हते, असे म्हटले गेले. शिवसेना सोनिया गांधींपुढे लाचार झाल्याची टीका केली. इतरांचे उंबरठे झिजवल्याचे म्हटले. पण जे मातोश्रीवर आले ते खोटे बोलले. हा खोटेपणा माझ्या हिंदुत्त्वात नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले की, एकदा शब्द दिला तर मागे हटू नको. मात्र गरज सरो आणि वैद्य मरो असेच त्यांचे आमच्याविषयी धोरण होते. कोणाची पालखी वाहण्यासाठी शिवसेनेची स्थापना झालेली नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. कारतो आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -