मुंबई : विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळातील कामकाजाचा शिवबंधन कार्यअहवाल प्रकाशन सोहळा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) मुंबईत पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ठाकरे गटातील एकून 9 खासदारांपैकी 6 खासदार हे एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. यावरच भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, फोडाफोडी करायची असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा. (Uddhav Thackeray appeals to keep government machinery aside if MPs want to be thrashed)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. यावरून टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान केले, असे म्हटले जाते. एकेकाळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते, तेव्हा हे (नरेंद्र मोदी) बोलत होते की, पंतप्रधान रेनकोट घालून आंघोळ करतात. ते (नरेंद्र मोदी) भाविक असतील, त्यामुळे त्यांच्या श्रद्धेला मी तडाखा मारत नाही. पण गंगेत डुबकी मारताना आपला रुपया सुद्धा डुबतो आहे याच्याकडे सुद्धा त्यांचे लक्ष असले तर बरे, असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आता दिल्लीच्या तख्तावर जे बसले आहेत त्यांना माहिती नाही की, त्यांचे तक्त महाराष्ट्र राखतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर जुलूम केला तर “दिल्लीचेही तक्त फोडतो महाराष्ट्र माझा” ही नवीन ओळ आपल्याला लिहावी लागेल. सगळेच तुमचे गुलाम होऊ शकत नाहीत आणि होणारही नाहीत. कारण गुलामी महाराष्ट्राच्या रक्तामध्ये नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा – Maharashtra : राज्यात आणखी एक योजना बंद, अर्थसंकल्पीय प्रकाशनांसाठी बॅग देण्याची पद्धत बंद
एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे वाट चुकले आहेत त्यांना असं वाटतंय की आपल्याला मोक्ष मिळेल, पण असं अजिबात होणार नाही. कारण महाराष्ट्रावर अन्याय करून कोणाला मोक्ष मिळणार नाही. त्यामुळे तुमचा काय सोक्षमोक्ष लावायचा आहे तो आम्ही इथेच लावू. आपल्याला पराभव पचलेला नाही, तसा त्यांना विजय सुद्धा पचलेला नाही. कारण एवढं बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री कोण हे ठरवायला एक महिना लागला. काही ठिकाणी पालकमंत्री पद अजून ठरत नाही आणि या सगळ्या खेचाखेचीला तुम्ही बाळासाहेबांचे विचार म्हणता? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.
खासदार फुटणार असल्याच्या चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज सकाळी बातमी सोडून दिली होती की, शिवसेनेचे सहा खासदार फुटणार. माझं त्यांना आवाहन आहे, हिंमत असेल तर फोडून दाखवा. पण आता शिवसैनिकांच्या संयमाचा अंत बघू नका. कारण फोडाफोडी करायला लागलात तर कधीतरी तुमचं डोकं देखील फुटेल. तरीही फोडाफोडी करायची असेल तर सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा बाजूला ठेवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिले.