घरताज्या घडामोडीमराठवाड्यातील विकासकामांच्या प्रकल्पांना गती देणार - मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मराठवाड्यातील विकासकामांच्या प्रकल्पांना गती देणार – मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Subscribe

मराठवाड्यात २०० मेगावॉट सौर प्रकल्प उभारणार

शिक्षण, आरोग्य, परिवहन, नगर विकास, पायाभूत सुविधा, कृषी अशा विविध क्षेत्रात मराठवाड्याचा आमुलाग्र कायापालट घडवणारे अनेक महत्त्वाचे निर्णय राज्यातील विद्यमान सरकारने घेतले आहेत. त्यांची कालबद्ध अंमलबजावणी करुन येथील विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान केली जाईल, असा निर्धार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी येथे व्यक्त केला.

जगभरातील अभ्यास याठिकाणी यावेत

लोहपुरूष वल्लभभाई पटेल यांच्यासमोर निजामाने शरणागती पत्करल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिन्यांनी स्वातंत्र्य झालेल्या मराठवाड्याचा सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचे कार्य शासन करत असल्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाडा संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये पैठण या ठिकाणी संतपीठाची स्थापना करण्यात आली आहे. या संतपीठाचे विद्यापीठ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. या ठिकाणी जगातील संशोधक, अभ्यास याठिकाणी यावेत, अशी अपेक्षा आहे. संतपीठाची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे देण्यात आलेली आहे. तसेच जुलमी निजामी राजवटीच्या खुणा पुसून काढण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील १४४ निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्या या नव्याने बांधून त्यांचा पुनर्विकास करण्यात येऊन वैभव प्राप्त होतील अशा शाळा निर्माण करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवा

मराठवाड्यातल्या पहिल्या जागतिक दर्जाच्या सिथेंटीक ट्रॅकचे काम औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना दिली जाईल. जेणे करून मराठवाड्यातील उद्योग व्यवसायास फायदा होईल. औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवा सुरु होऊ शकते का याचाही विचार करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबाद पाणी पुरवठा प्रकल्प

औरंगाबादेत नव्याने समाविष्ट सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणाचे, विविध मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचे कामे करण्यात येत आहेत. औरंगाबादची तहान भागवणारा आणि खूप काळ आपण वाट पाहत असलेल्या १६८० कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे कामही वेगाने सुरु आहे. हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा फायदा मराठवाड्याला होणार आहे. औरंगाबाद- शिर्डी मार्गाचे श्रेणीवाढ करण्यात येईल. समृद्धीला जोडणाऱ्या १९४.४८ कि.मी.च्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देण्यात येईल.

- Advertisement -

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन वैशिष्ट्यपूर्ण राहील. या ठिकाणाहून स्फूर्ती, प्रेरणा मिळेल, असे स्थळ करण्यावर शासनाचा भर राहील. तसेच जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण पार्क म्हणून औरंगाबाद सफारी पार्कसाठी जागेची निश्चिती करून तातडीने आवश्यक त्या परवानग्या मिळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने करावी व पुढील काही महिन्यांत हे काम पूर्ण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.

परभणी, हिंगोली, उस्मानाबादमध्येही विकासाला प्राधान्य

परभणी येथे २०० बेडसचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. परभणी शहरात भूयारी गटार योजना, अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेचाही विचार सुरू आहे. तसेच उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालय, भूमिगत गटार योजनेचे कामही सुरू आहे. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन देण्यात येत आहे. हिंगोलीतील दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी सहा कोटी रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे. औरंगाबादेतील घृष्णेश्वर मंदिर सभामंडपाचा विकास, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसर, नाथ मंदिर परिसराचा विकासही करण्यात येणार आहे. निधीअभावी कोणताही प्रकल्प, योजना रखडणार नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठवाड्यात २०० मेगावॉट सौर प्रकल्प उभारणार

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत ३६० मेगा वॅट सौर प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. त्यापैकी ११९ मेगा वॅट प्रकल्प मराठवाड्यात. तसेच मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील टेंभी आणि बीड जिल्ह्यातील वडवणी येथे येत्या वर्षात जवळपास २०० मेगा वॅट सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


हेही वाचा :  अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाची पुन्हा छापेमारी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -