मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आज (गुरुवार, 23 जानेवारी) जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत पार पडले. यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांचा मेळावा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पार पडला. यावेळी केवळ ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचेच भाषण झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी हिंदू बांधवांनो, भगिंनींनो आणि मातांना असे म्हणत भाषणला सुरुवात केली. त्यांनी या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत भाजपा नेते अमित शहांना खडेबोल सुनावले. मिठी मारू तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर वाघनखं काढू, असा इशाराच त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला. (Uddhav Thackeray attack on the Mahayuti from Andheri Melava)
यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या अमित शहांनी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरून अडीच वर्ष आपल्या महाराष्ट्रावर घटनाबाह्य सरकार लादले, ते असा तसा महाराष्ट्र आपल्या हातातून सुटू देतील का? एक तर महाराष्ट्राने मोदींच्या अश्वमेधाचे गाढव लोकसभेत ज्या पद्धतीने अडवले, तो फटका लागून त्यांच्या वर्मी जो घाव बसला आहे, त्यातून ते उभारू शकलेले नाही. त्यांना पक्के माहीत होते की ज्या क्षणी महाराष्ट्र आपल्या हातून जाईल, त्या क्षणी दिल्ली कोलमडणार आहे. जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतले सरकार कोलमडलेले दिसले असते आणि हीच महाराष्ट्राची ताकद आहे.
हेही वाचा… Uddhav Thackeray : औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शहा काय; उद्धव ठाकरेंचा इशारा
अमित शहांचा समाचार तर मी घेणारच, ते काल काय बोलले याचा समाचार आज घेणार, उद्या काय बोलतील त्याचा समाचार नंतर घेईल. पण त्यांचा समाचार मी घेणारच, त्यांना मी नाही सोडत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांवर निशाणा साधला. ज्या प्रमाणे अफजल खानाच्या पोवाड्यात आहे की, मिठी मारू तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर वाघनखं काढू, कारण हा महाराष्ट्र आहे आणि हीच शिवरायांची शिकवण आहे, असे म्हणत ठाकरेंनी शहांना इशारा दिला. शरद पवारांनी 78 साली जी गद्दारी केली, त्यामुळे त्यांना 20 फूट खोल गाडले, असे अमित शहा म्हणाले होते. पण त्यांना कल्पना नसेल की, 78 सालीच शरद पवारांनी जो पुलोदचा प्रयोग केला होता, ती जी दगाबाजी केली होती, त्यामध्ये जनता पक्ष म्हणून भाजपा सुद्धा सहभागी होता. कारण त्यामध्ये हसू अडवाणी नावाचे भाजपाचे नेते जे चेंबूरमधून निवडून येत होते, ते त्या पुलोदच्या सरकारमध्ये मंत्री होते, त्यामुळे दगाबाजीचे राजकारण यांनीच सुरू केले असून त्याला खतपाणी घालण्याचे काम सुद्धा हेच करत आहेत, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.