मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेना ठाकरेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना भावनिक आवाहन करण्याबरोबरच शिवसेना ठाकरे गटाने हिंदुत्व सोडलेले नाही, हे ठसवण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच भाजप कसे वेळोवेळी सोयीसोयीने भूमिका बदलत राहिली आहे, याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनता पक्ष आणि भाजपच्या स्थापनेपासूनची अनेक उदाहरणे देऊन त्यांनी निशाणा साधला. बुरसटलेलं गोमुत्रधारी हिंदूत्व आम्हाला मान्य नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या हिंदुत्वाचीही व्याख्या यावेळी समजावून सांगितली.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. शिवसेना ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या. मात्र लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत झाली नाही. शिवसेना ठाकरे गटाला फक्त 20 जागा मिळाल्या. याचे विश्लेषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर आपण भ्रमात राहिलो. आपण गाफील राहिलो. या गाफीलपणाचा गैरफायदा भाजपने घेतला. भाजपने आपल्याबद्दल अपप्रचार केला. महाराष्ट्रात भाषण करताना मी ‘तमाम देशभक्त मातांनो भगिणींनी’ असा उल्लेख करायचो, त्याचा त्यांनी असा प्रचार केला की मी हिंदूत्व सोडलं. त्यांनी घराघरात जाऊन हा अपप्रचार केला.
ठाकरेंनी सांगितली हिंदुत्वाची व्याख्या
मात्र मोदी हे वारंवार सांगतात की मी माझ्या लहानपणी आमच्या घराशेजारील मुस्लिम कुटुंबाकडू आमच्याघरी जेवण येत होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत मशिदीत गेले होते. मग यांचं हिंदुत्व कोणतं? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्या भाजपने आम्हाल हिंदूत्व शिकवू नये. महाराष्ट्र आणि मराठीच्या मुळावर येणारं आमचं हिंदूत्व नाही.
मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कडवट हिंदू म्हणून लढायला तयार आहोत. बुरसटलेलं गोमुत्रधारी हिंदूत्व आम्हाला मान्य नाही. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबात आम्ही जन्माला आलो. आमचं हिंदूत्व सुधारणावादी आहे. लोकसभा निवडणुकीत देशप्रेमी मुस्लिमांनी आमचं हिदूत्व मान्य करुन आम्हाला मतदान केलं म्हणून यांना पोटशूळ उठला”, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. आम्हाला देशप्रेमी मुसलमानांचं वावडं नाही, पण देशद्रोही हिंदू जरी असला तरी तो आम्हाला नको आहे. कुरुलकर सारखे हिंदू आम्हाला मान्य नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवा!
भारताच्या तिरंग्यात हिरवा रंग आहे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कित्येक वर्षे तिरंगा फडकवला नाही, असा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपच्या झेंड्यात हिरवा रंग आहे. तुमच्या झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवा. शिवसेनेने १९८७ साली पार्ल्यातील पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर लढून जिंकून दाखवली. बाळासाहेबांनी दाखवून दिलं हिंदूत्वावर निवडणूक जिंकता येते, त्यानंतर भाजपने शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव दिला.
भाजप आणि आरएसएस हे काड्या लावायच्या आणि पळून जाणाऱ्यांची औलाद आहे असा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले की, बाबरी मशिद पाडल्यावर तिथून सर्व निघून गेले. बाबरी पाडल्याबद्दल वाजपेयी आणि अडवणांनी माफी मागितली. उद्धव ठाकरेने कधीही माफी मागितली नाही. तुम्ही ठरवा की तुमचं हिंदुत्व नेमकं कोणतं आहे. कोणाला रक्ताची गरज पडली तर आरएसएसवाले म्हणतील की रक्त नाही देऊ शकतो गोमुत्र देतो. मात्र शिवसैनिक हा रक्त देण्यासाठी तयार असतो. विधानसभा निवडणूक काळात 90 हजार संघाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात बोलवले होते. हे उपरे मराठी माणसाला गरज पडली तर रक्त देणार आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
हेही वाचा : Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे मुंबई महापालिका एकटं लढण्याचे संकेत; शिवसैनिकांची तयारी बघून निर्णय घेणार