मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर थेट अमेरिकेकडून लाचखोरीचे आरोप झाले आहेत. ज्यानंतर देशाच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पण या प्रकरणावरून आता विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही केंद्रावर निशाणा साधला आहे. गुरुवारी (ता. 21 नोव्हेंबर) अदानीबाबतचा जो बॉम्ब फुटला तो चार दिवस आधी फुटायला हवा होता, असा टोला ठाकरेंनी लगावला आहे. शुक्रवारी (ता. 22 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दादरमधील भाजपाचे नेते सचिन शिंदे यांनी प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी संवाद साधत आपले मत व्यक्त केले. (Uddhav Thackeray criticism on Adani bribery case)
मुंबई भाजपा सचिव सचिन शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बाधले. यावेळी शिंदे यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. या प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी आणिउपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सर्वांना उद्याची उत्सुकता आहे. पण उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. आज सचिन शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर सचिन यांनी जी व्यथा मांडली की त्यांच्यासोबत अन्यायही झाला नाही, पण तुम्हाला शिवसेना ठाकरे गटात येऊन पश्चाताप होणार नाही, असा शब्द यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.
हेही वाचा… Politics : भाजपाने घेतलेली उडी म्हणजे…, अदानी प्रकरणी ठाकरे गटाचा थेट हल्लाबोल
यावेळी उद्धव ठाकरेंनी गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत म्हटले की, एकच जरा थोडीशी रुखरुख म्हणण्यापेक्षा काल (गुरुवार, 21 नोव्हेंबर) जो बॉम्ब फुटला. तो जर चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता. तरी देखील 19 तारखेला एक बॉम्ब फुटलेला आहे आणि हा जो काही वसई-विरारला नोटांचा बॉम्ब फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे. गुरुवारच्या बॉम्बने फक्त देश नाही तर जग हादरला आहे. हा इतका मोठा घोटाळा कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. त्यामुळे या घोटाळाबाजांचे काय करणार? हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे, असा टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पण निवडणुकीच्या निकालानंतर ते अदानी प्रकरणावर सविस्तर बोलणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.