घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीसांच्या भेटीने शिंदे गटात चलबिचल; शंभूराज देसाईंनी दिली...

उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीसांच्या भेटीने शिंदे गटात चलबिचल; शंभूराज देसाईंनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सतराव्या दिवशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधानसभेत आज एकत्र दिसून आले. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षात मुख्यमंत्रीपदावरून दुरावा निर्माण झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनले. परंतु काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी काही आमदारासह बंड केले आणि भाजपाच्या साथीने सरकार बनवले.

पंचवीस वर्षांची दोस्ती मोडून वेगळे झालेले दोन नेते आज विधानभवन परिसरात एकत्र येताना पाहुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. युती तुटल्यानंतर नियमितपणे एमेकांवर टीकास्त्र डागणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन परिसरात एकत्र एन्ट्री घेतली, त्यामुळे सगळ्यांनीच भुवया उंचावल्या. या दोघांच्या एकत्र येण्याने युतीचा नवा फॉर्म्युला तयार होणार का अशी चर्चाही दबक्या आवाजात रंगली. यावर आता शिवसेनेतील मंत्री शंभूराज देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शंभूराज देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र भेटल्याचे पाहून चांगले वाटले. उद्धव ठाकरेंना फडणवीस यांनी सांगितल असेल की, शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तबसुद्धा केले आहे. त्यामुळे तुम्ही आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एकत्र काम करा. फडणवीसांनी असे म्हटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.

त्यानंतर त्यांना उद्धव आणि फडणवीसांच्या भेटीने शिवसेनेच्या शिंदे गटात चलबिचल असल्याचे महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत. याबद्दल देसाईंना विचारले असता, ते म्हणाले की, आमच्या गटातील लोकांच्या चालण्या, बोलण्यात तुम्हाला आज कुठं तसे जाणवले का? आम्ही नेहमीप्रमाणे आज विधानसभेत आलो आणि अधिवेशनाचे, दिलेल्या विभागाचे काम करत आहे. चलबिचल आणि चिंता करण्याचं काम आमच्या पक्षातील नेते करत नाही. तसेच महाविकास आघाडीतील नेते सरकार पडेल म्हणून तारखावर तारखा देऊन थकली आहे. पण, अजूनही सरकार पडलेले नाही आणि यापुढेही पडणार नाही. कारण, शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात भक्कमपणे उभे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -