घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री ठाकरेंची वर्षावर सलग दुसरी धडाक्यात दिवाळी

मुख्यमंत्री ठाकरेंची वर्षावर सलग दुसरी धडाक्यात दिवाळी

Subscribe

विरोधकांचे सरकार पडण्याचे सर्व दावे फोल

मुंबई- बरोबर दोन वर्षांपूर्वी अर्थात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तेव्हापासून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार पडण्याच्या, पाडण्याच्या विविध तारखा तसेच मुहूर्त जाहीर केले होते. मात्र, केवळ भाजपा नेत्यांचेच सरकार पाडण्याचे सर्व दावे- प्रतिदावे खोटे ठरवत उद्धव ठाकरे हे यंदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसरी दिवाळी धडाक्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर साजरी करत आहेत.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे भक्कम सरकार असताना, शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाच्या नेतृत्वाने काँग्रेस व राष्ट्रवादी या सारख्या यापूर्वीच्या राजकीय मतभिन्नता असलेल्या पक्षांबरोबर दोन वर्षे ते देखील कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणू साथीशी समर्थपणे मुकाबला करत अत्यंत खडतर, प्रतिकूल परिस्थितीत सरकारचा आणि राज्याचा कारभार यशस्वीपणे चालवून दाखवला आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी परंपरागत मित्रपक्ष असलेल्या भाजपासारख्या बलाढ्य राष्ट्रीय पक्षाशी असलेली युती तोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अस्तित्वासाठी तसेच शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठबळावर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तास्थापन केले. या सरकारचे जन्मदाते म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून या आघाडी सरकारचे नेतृत्व करण्याची अत्यंत अवघड जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली. वास्तविक उद्धव यांना मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते. ते स्वतः त्यांनी तसेच शरद पवार यांनी देखील अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवले आहे. मात्र, शरद पवार यांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हावे लागले.

राज्यात सत्ता येऊन तीन महिने होत असतानाच फेब्रुवारी- मार्च महिन्यातच कोरोनाने संपूर्ण देशाला विळखा घातला आणि देशासह महाराष्ट्रातही टाळेबंदी लागू झाली. तेव्हापासून ते अगदी या दिवाळीपर्यंत तब्बल दोन वर्षे राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे विविध पातळीवर कोरोनाशी लढत आहेत. या दिवाळीला राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांनी केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे दिवाळीच्या आधी टाळेबंदीचे निकष मोठ्या प्रमाणावर सामान्य जनतेला दिलासा देणारे ठरावेत असे निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासारख्या महानगरांसह राज्यातील ग्रामीण भागातही दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी या सरकार पाडण्याचे, पडण्याचे दर महिना, पंधरा दिवासांनी वेगवेगळे मुहूर्त, तारखा दिल्या. मात्र, तारखा देण्यापलीकडे आणि त्या उलटून जाण्यापलीकडे काहीच होऊ शकले नाही. राज्यात सर्वाधिक १०६ आमदार भाजपाचे असताना ५६ आमदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याची ठसठसणारी सल अजूनही माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मनात व डोक्यात अजूनही आहे. त्यामुळेच त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असाच बर्‍याचवेळा केला जातो. राजकारण हे शेवटी अळवावरच्या पाण्याप्रमाणे असते असे म्हणतात. त्यामुळे कदाचित भविष्यात फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतीलही. मात्र, संसदीय कार्यपद्धतीचा कोणताही अनुभव नसलेल्या तसेच आमदार, खासदार मंत्री म्हणून कामाचा अनुभव दूरच राहिला.

यापूर्वीच्या आयुष्यात साधे नगरसेवकही नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्यांसारख्या नेतृत्वाने कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीच्या साथीत, सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असताना आणि सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना या महाराष्ट्राचा कारभार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दोन वर्षे राजकीय विरोधकांच्या हल्ल्यातही अत्यंत समर्थपणे सांभाळला. त्यामुळेच भाजपा नेत्यांनी सरकार पडण्याचे केलेले सर्व दावे, प्रतिदावे, तारखा, मुहुर्त धुडकावून लावत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून ठाकरे सरकारची दिवाळी वर्षावर सलग दुसर्‍या वर्षी धडाक्यात साजरी करत आहेत.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -