घरदेश-विदेशधार्मिक रंग न देता कारवाई करा

धार्मिक रंग न देता कारवाई करा

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये साधूंच्या हत्येवरून उद्धव ठाकरेंचा योगींना टोला

पालघरमध्ये साधूंच्या हत्येवरून विरोधकांकडून राज्यातील ठाकरे सरकारवर टीका होत असताना आता उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून साधूंच्या हत्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशा घटनेचे राजकारण करू नये, त्याला धार्मिक रंग देऊ नये. आम्ही जशी आरोपींवर कठोर कारवाई केली, तशीच कारवाई तुम्हीही करावी, असा टोला ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला.

साधूंच्या झालेल्या अमानुष हत्येच्या विरोधात आम्ही तुमच्यासोबत आहोत. ज्याप्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली, त्याचप्रकारे तुम्हीसुद्धा करून दोषींना कडक शिक्षा कराल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे पालघर येथील साधूंच्या हत्येनंतर राज्यात भाजपने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील या प्रकरणी ट्विट करत उत्तर प्रदेशातील सांधूंच्या हत्येची घटना अत्यंत निर्घृण आणि अमानुष असल्याचे म्हटले आहे. सर्व सबंधितांना आवाहन आहे की, या विषयाचे कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश करोनाशी लढत आहे. शांतता राखा.योगी आदित्यनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील, असे राऊत यांनी म्हटले आहे.

‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’
विशेष म्हणजे आता या प्रकरणावरून काँग्रेसनेदेखील भाजपला चिमटे काढले आहेत. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधूंच्या निर्घृण हत्येवर ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’, असा जळजळीत सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे. बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधूंच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध करून सावंत यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेबाबत संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, भाजपचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे हे निदर्शक आहे. पालघरच्या मॉब लिंचिंगच्या दुर्दैवी घटनेमध्ये दोन साधूंसह तिघांची हत्या झाली होती. या घटनेनंतर त्याच रात्री महाराष्ट्र पोलिसांनी धरपकड करून ११० आरोपींना ताब्यात घेतले आणि उच्चस्तरीय चौकशीची घोषणा करण्यात आली होती.

- Advertisement -

पालघरच्या घटनेसाठी चोरांची अफवा कारणीभूत असल्याचे तातडीनेच स्पष्ट झाले होते. तरीही भाजपने त्या घटनेला धार्मिक रंग देऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तोच भारतीय जनता पक्ष बुलंदशहरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडाबाबत ‘कानठळ्या बसवणारे मौन’ धारण करून बसला आहे. यातून त्यांचा दुतोंडीपणा आणि करोनासारख्या संकटकाळातही राजकारण करण्याची निषेधार्ह प्रवृत्ती चव्हाट्यावर आल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -