मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही उद्धव ठाकरेंचं विधान परिषद सदस्यत्व कायम

uddhav thackeray

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती. परंतु मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्या विधानपरिषदेचे सदस्यत्व अद्यापही कायम आहे. ८ जुलै २०२२ रोजी विधान परिषदेच्या आमदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. विधिमंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये शिवसेनेच्या आमदारांचा उल्लेख आढळून आला होता. मात्र, या यादीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंही नाव दिसून आल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विश्वासदर्शक ठरावाआधीच उद्धव ठाकरे यांनी आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी राजीनामा देखील दिला होता. परंतु याचवेळी उद्धव ठाकरेंनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं देखील जाहीर केलं होतं. २९ जूनच्या फेसबुक लाइव्हनंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. २०१९ साली ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली होती.

८ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ १४ मे २०२० ते १३ मे २०२६ पर्यंत दाखवण्यात आला आहे. या यादीत शिवसेनेच्या इतर आमदारांचाही समावेश असून मनिषा कायंदे, अनिल परब, आमशा पाडवी, विलास पोतनीस, नीलम गोऱ्हे, सचिन अहिर, सुनिल शिंदे, विप्लव बाजोरीया, अंबादास दानवे, दुष्यंत चतुर्वेदी यांचाही समावेश आहे.


हेही वाचा : मुसळधार पावसाचा मुंबई परिसराला तडाखा, ७ जिल्ह्यांना रेड