घरताज्या घडामोडीगुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचं योगदान, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचं योगदान, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

Subscribe

सातत्याने महाराष्ट्राचा अपमान केला जातोय आणि अवहेलना केली जात आहे. महाराष्ट्राचं अस्तित्व नाकारण्यात येत आहे. एकीकडे महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय. त्याविषयी आम्ही मोर्चाच्या वेळी बोलणार आहोत. मुंबईवर कशापद्धतीने घाला घालण्याचं काम केलं जातंय, त्यावरही हा विषय होणार आहे. महाराष्ट्रातून जे उद्योग पळवण्यात आले. याबाबतीत मी निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. गेल्या वेळी दिल्ली महापालिका, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या तीन निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष जिंकला होता. यावेळी दिल्लीमध्ये आप जिंकली आहे. हिमाचल काँग्रेस जिंकली आहे. तर गुजरातमध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. या यशाचे जे मानकरी आहेत, त्यांचं अभिनंदन आम्ही करत आहोत. गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचं सुद्धा योगदान आहे. हे कोणीही विसरु नये, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन

- Advertisement -

१७ तारखेला होणाऱ्या महाराष्ट्रद्रोही सरकाविरोधात विराट मोर्चाच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीने बैठक घेतली. यावेळी बैठकीत उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले उपस्थित होते. गुजरातच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योगधंदे जसे गुजरातला पळवले तसेच कर्नाटकची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील गावं तोडतील की काय?, अशी भिती देखील एकप्रकारे निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रद्रोह्यांना जर अडवलं नाही तर महाराष्ट्र हे छिन्नविछिन्न करण्यासाठी मागेपुढे बघणार नाहीत, यांच्या मनामध्ये एक विष होतं ते आता जगजाहीर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन आम्ही करत आहोत,असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ही एकाच देशातील दोन राज्यं की हिंदुस्तान-पाकिस्तान?

- Advertisement -

सीमाभाग हा सीमाभाग नसून कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. तेथील गावं ही पिढ्यानंपिढ्या आणि सातत्याने लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका जिंकून मला महाराष्ट्रात जायचं आहे, असं दाखवून दिलं होतं. एकीकडे आज आंदोलनं होत आहेत. तर ५ तारखेला पत्रकार परिषद झाल्यानंतर कानडी भागांमध्ये मराठी भाषिकांवर कानडी अत्याचार झाले. काही जणांना अटक सुद्दा करण्यात येत आहे. परंतु एक प्रश्न असाही समोर येतो की, ही एकाच देशातील दोन राज्यं आहेत, की हिंदुस्तान-पाकिस्तान आहेत. महाराष्ट्रातील वाहनांना तिकडे जायला बंदी आणि काळं फासलं जातं. महाराष्ट्रातील नेत्यांना त्याठिकाणी येण्यास बंदी, त्यामुळे तिथे तुम्ही व्हिसा सीस्टिम सुरू करणार का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या दबावामुळे गप्प बसणार असतील तर..

केंद्र, कर्नाटक आणि महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार आहे. एका पक्षाचं सरकार तिन्हींकडे असल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री जोरात बोलतात. तर महाराष्ट्राला कुणीच मुख्यमंत्री, नेता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार यामध्ये कोणती भूमिका घेणार आहे. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या दबावामुळे गप्प बसणार असतील तर याचा काय अर्थ काढायचा?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

आजच्या बैठकीचा हेतू अजित पवार यांनी सांगितला आहे. पर्वाची बैठक धावपळीत झाल्यामुळे आम्ही मोजकेच लोकं उपस्थित होतो. आज महाविकास आघाडीचे सर्व घटक आणि मित्रपक्ष एकत्रित आहेत. १७ तारखेला महाराष्ट्र द्रोहींविरुद्ध हल्लाबोल करण्यासाठी विराट मोर्चाची सुरूवात जिजामाता उद्यानापासून होईल. हा मोर्चा ना भूतो आणि भविष्यती असा होणार आहे, असं ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : भाजपकडून ऑपरेशन लोटसची शक्यता; मुख्यमंत्री बघेल, राजीव शुक्ला हिमाचलला रवाना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -