मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर थेट निशाणा साधला. तसेच त्यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी घेतलेल्या भेटीवरही प्रश्न विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करत भाजपवर निशाणा साधला. (Uddhav Thackeray on Sharad Pawar and Ajit Pawar meet up on Sharad Pawar birthday)
हेही वाचा : Uddhav Thackeray : दादर स्थानकातील हनुमान मंदिराला रेल्वे मंत्रालयाकडून नोटीस; हेच भाजपचे हिंदूत्व आहे का?
पक्षफुटीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावरून अनेक राजकीय चर्चा रंगल्या. याबद्दल शिवसेना उबाठाचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे यावर काहीही बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले की, “मी दुसऱ्या कोणत्याही विषयावर बोलणार नाही. मला बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार काय भूमिका घेते? ते स्पष्ट करावे.” असे म्हणत अजित पवार-शरद पवार भेटीबद्दल बोलणे टाळले.
तसेच, या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला होणाऱ्या विलंबाबाबत विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, “मी काल बातम्या पाहिल्या. याचे खासदार फोड, त्याचे खासदार फोड, हेच सुरू आहे. भाजपचे हिंदुत्व खोटे आहे. राक्षसी बहुमत किती पाहिजे? बहुमत मिळूनही त्यांना विस्तार करता येत नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी बोलावे. आज बांगलादेशमधील हिंदूंवर ही परिस्थिती असेल तर इतरांचे काय? बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे, त्यावर मोदींनी बोलावे.” असे त्यांनी पुन्हा सांगितले.
Vijay Wadettiwar : भाजपला फोडाफोडी केल्याशिवाय चैन पडत नाही; वडेट्टीवरांनी केले हे आरोप
दरम्यान, 12 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांचा वाढदिवस होता. यावेळी त्यांच्या भेटीसाठी असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गर्दी केली होती. तसेच, शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांच्या आग्रहास्तव केक कापत जल्लोषात आपला वाढदिवस साजरा केला. पण यावेळी चर्चेत राहिली ती अजित पवार यांनी वाढदिवसानिमित्त शरद पवार यांची घेतलेली भेट. त्यांच्या भेटीनंतर ते दोघे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.