उद्धव ठाकरे पुन्हा पक्षप्रमुख? ठाकरे गटाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्याने खरी शिवसेना ही शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नाही तर गट म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पण याच ठाकरे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 18 जूनला होणार आहे.

Uddhav Thackeray party chief again? decision will be taken in executive meeting of Thackeray group

शिवसेना म्हंटल की पहिली आठवण होते ते पक्षप्रमुखपदाची. परंतु, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेना पक्षाचा प्रमुख कोण हेच अद्याप ठरू शकलेले नाही. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्याने खरी शिवसेना ही शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नाही तर गट म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पण याच ठाकरे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 18 जूनला होणार आहे. यावेळी ठाकरे गटाचे सर्व नेते, राज्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर याच बैठकीत उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षाच्या पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Uddhav Thackeray party chief again? decision will be taken in executive meeting of Thackeray group)

हेही वाचा – ठरलं! कर्नाटकला ‘या’ तारखेला मिळणार नवा मुख्यमंत्री; खर्गेंनी सोडवला तिढा

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. ठाकरे गट हीच खरी शिवसेना असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. पण शिवसेनेत झालेल्या भूकंपानंतर पहिल्यांदाच ही बैठक पार पडणार आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत ही 23 जानेवारी 2023 ला संपली होती.

तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला शिवसेना मूळ पक्ष म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. या निर्णयास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या याचिकेवर उन्हाळी सुट्टीनंतर जुलैमध्ये सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयानुसार शिंदे गट हाच मूळ शिवसेना पक्ष आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर ज्यावेळी मुंबईत अंधेरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुक पार पडली त्यावेळी आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव आणि मशाल निवडणूक चिन्ह दिले आणि तो निर्णय पुढील आदेशापर्यंत कायम राहील, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत संपल्याने आणि विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या याचिकांवर कार्यवाही सुरु केल्याने कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ठाकरे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

बुधवारी शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. ठाकरे यांनी राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी सदस्य आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांची लोकशाही पध्दतीने निवड झाली पाहिजे, असे आयोगाने आपल्या आदेशात म्हटले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवश्यक ठराव आणि कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल.

आमचा गट हीच मूळ शिवसेना असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख म्हणून ठाकरे यांची निवड केल्यास आणि कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची निवड केल्यास शिवसेना मूळ पक्षावरील अधिकार सोडल्याचा निष्कर्ष काढला जाण्याची भीती आहे. त्यामुळे कायदेतज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरविले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी तालुका पातळीपासूनच्या सुमारे तीन-साडेतीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रांत ही बैठक होईल. शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जूनला पार पडणार असून या प्रसंगी उद्धव ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. त्यामुळे भाजपचे आमदार असलेले राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष असल्याने आता तो या प्रकरणी नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. तर याबाबतच्या कामाला त्यांच्याकडून सुरूवात करण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे 54 आमदार शिवसेना पक्षातून निवडून आले होते, त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. तसेच येत्या सात दिवसांत या आमदारांना पक्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.