राऊतांवरील हक्कभंगप्रकरणी ठाकरेंचा रोखठोक प्रश्न, देशद्रोही कोण ते स्पष्ट करा!

Uddhav Thackeray

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा बनावट शिवसेना असा उल्लेख करीत हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. यावरून राज्याच्या राजकारणात बराच गोंधळ झाला. याचे पडसाद विधिमंडळातील अधिवेशनातही उमटले. बुधवारचे कामकाज याच मुद्द्यावरून गाजले. अखेर, संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही संबोधलं होतं, हे देशद्रोही नेमके कोण हे स्पष्ट करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयातील युक्तीवाद आणि कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकींच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर ताशेरे ओढले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोह्याला चहापानाला बोलावलं होतं का? जर ते आले असते तर देशद्रोह्यांसोबत चहापानाला बसले असते का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. संजय राऊतांविरोधात आलेल्या हक्कभंगाप्रकरणी आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी वरील उत्तर दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, संजय राऊत नेमकं काय म्हणाले आहेत हे मी त्यांना वैयक्तिक त्यांना विचारेन. ते सध्या दौऱ्यावर आहेत. ते दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांच्याशी बोलून याबाबतची भूमिका स्पष्ट करेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, संजय राऊतांवर हक्कभंग लावल्याप्रकरणी ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवरही टीकास्त्र डागलं आहे. राज्यातील विरोधीपक्षांना हे देशद्रोही संबोधतात. तथाकथित देशद्रोही चहापानाला आले असते तर चहापान केलं असतं का असा सवाल त्यांनी विचारला. महाराष्ट्रद्रोही सरकार म्हटल्याचं पवारांनी मान्य केलं. मग मुख्यमंत्री देशद्रोही कोणाला म्हणाले? देशद्रोही कोण हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, असं ठाकरे म्हणाले.