घरमहाराष्ट्रमुंबई- नागपूर बुलेट ट्रेनने जोडणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार

मुंबई- नागपूर बुलेट ट्रेनने जोडणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार

Subscribe

औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीचे भूमिपूजन

औरंगाबाद येथील जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम अद्ययावत, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत करावे. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडण्याचा पुनरुच्चार केला. औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकाम भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याच कार्यक्रमात पैठणच्या संतपीठाचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात आले. औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आदी उपस्थित होते.

जनहिताच्या कामात राजकारण आणणार नसून यापुढेही राजकीय मतभेद दूर ठेवून वाटचाल केली जाईल असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले की, जिल्हा परिषद इमारत आकर्षक आणि देखणी झाली पाहिजे. याबरोबरच तिच्या सेवेचा दर्जाही उत्कृष्ट असला पाहिजे. १८ महिन्याच्या आत ही इमारत पूर्ण झाली पाहिजे या अटींवर इमारत बांधकामासाठी २० कोटी दिले जातील. या इमारतीच्या बांधकामाबरोबरच ती सुंदर होण्यासाठीही प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडले जावे ही आमची पूर्वीपासूनच इच्छा आहे. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असतानाच या ट्रेनबाबतही आमचा आग्रह होता. राज्याच्या राजधानीला उपराजधानीशी जोडणारी बुलेट ट्रेन राज्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. तिच्या पूर्ततेसाठी राज्य सरकार पूर्ण पाठीशी आहे अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांना यावेळी दिली.

याच कार्यक्रमात पैठणच्या संतपीठाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. मराठवाडा ही संतांची भूमी आहे, या संतांच्या भूमीत संतपीठ स्थापन होत आहे ही आनंदाची बाब आहे, असे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले.

- Advertisement -

मराठवाड्यात डीएमआयसी, समृध्दी महामार्ग होत असून दळणवळणाची साधने व्यापक उपलब्ध झाल्यास मराठवाड्याचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल. ग्रामीण विकासाचा पाया असलेल्या इमारतीचे लोकार्पण होत आहे असे सांगून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, म्हणाले की, मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प यशस्वी होऊ शकतो. यासाठी फक्त ३८ टक्के जागा द्यावी लागेल. त्यामुळे मुंबई-औरंगाबाद हे अंतर केवळ पावणे दोन तासात पार करणे शक्य होणार आहे.

तर पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून कोविड काळातही मोठ्या संकटाला आपण यशस्वीरित्या सामोरे गेलो. मुख्यमंत्र्यांनीच विकासाची धुरा हाती घेतल्याने विकसित प्रदेश म्हणून मराठवाडा लवकरच नावारुपाला येईल.

एकत्रित आलो तर भावी सहकारी

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी असे वक्तव्य केले. रावसाहेब दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती केली. त्यावेळी ठाकरे म्हणाले, माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे. मला रेल्वे का आवडते. कारण रेल्वेला रुळ असतात, रुळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारले तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असेही ते म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -