ठाकरेंचं ‘मिशन 40’, शिंदे गटाच्या आमदारांविरोधात उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या 40 आमदारांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात थेट दंड थोपटले आहे.

खरी शिवसेना कोणाची?, हा वाद अद्यापही निवडणूक आयोगाच्या कचेरीत सुरू आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल हा सुप्रीम कोर्टात असून 29 नोव्हेंबरला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. परंतु फैसल्याची पर्वा न करता ठाकरे गट आता निवडणुकीच्या रणांगणात उरतले आहेत. कारण आगामी काळात महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे ठाकरेंनी जिंकण्याचा विडा उचलला असून शिंदे गटाला चितपट करण्याचा डाव आखला आहे.

उद्धव ठाकरे मातोश्रीवर रोज बैठका घेत आहेत. तसेच त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा देखील घेतला आहे. औरंगाबादमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसात परतीच्या पावसामुळे राज्यातील शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीची उद्धव ठाकरेंनी पाहणी दौरा केला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील नाशिक जिल्ह्याचा दौरा करत येथील शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेतली. तसेच त्यांना धीर दिला.

काय आहे उद्धव ठाकरेंचं मिशन 40?

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात बंडखोरी झाली. त्यामुळे या प्रत्येक विभागाची जबाबदारी पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवण्यात येणार आहे. तसेच या नेत्यांकडून 40 बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात बारकाईनं विशेष लक्ष ठेवले जात आहे.

आगामी निवडणुकीसाठी ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामांची यादी तयार करायला घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचं प्रकरण अग्रस्थानी असणार आहेत. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्र्यांनी जी कामं केली होती,त्याची पोचपावती देण्याचं काम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. सध्या भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे हे एकत्र येणार असल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे ठाकरेंसाठी हे खूप मोठं आव्हान असणार आहे. परंतु ठाकरे आता काय रणनिती आखणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : शिवारात रमले मुख्यमंत्री!, राजकारणातून ब्रेक घेत शिंदेंनी केली शेती