घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : मोदींची महाराजांशी तुलना करणारे निर्बुद्ध, गोविंदगिरी महाराजांना उद्धव ठाकरेंनी...

Uddhav Thackeray : मोदींची महाराजांशी तुलना करणारे निर्बुद्ध, गोविंदगिरी महाराजांना उद्धव ठाकरेंनी सुनावले

Subscribe

पेण : राम मंदिर उभारले गेले याचा आनंद आहे, पण राम मोदींची संपत्ती नाही. काही लोक मोदींना देव मानत असतील, पण मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत असाल तर अशी लोक बिनडोक आहेत, निर्बुद्ध आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्यावर निशाणा साधला. पेण येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी गोविंदगिरी महाराज यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. (Uddhav Thackeray slams Govindgiri Maharaj for comparing PM Narendra Modi with Chhatrapati Shivaji Maharaj)

हेही वाचा… Uddhav Thackeray : मोदींनी तटकरेंना म्हटलं पाहिजे गेट आऊट! रायगडमधून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे आजपासून कोकणच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभेच्यादृष्टीने हा दौरा करण्यात येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात आजपासून (ता. 01 फेब्रुवारी) रायगड येथील पेणमधून झाली आहे. पेणमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या आठवड्यात राम मंदिराचे लाकार्पण झाले. याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. कारण अयोध्येत राम मंदिर हे व्हायलाच हवे होते. राम मंदिराच्या आंदोलनात शिवसेनेचे, शिवसेना प्रमुखांचे मोलाचे योगदान आहे. हे काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मला लोकार्पणाचे आमंत्रण येईल, आमंत्रण येणार नाही. त्याच्यापेक्षा आनंद व्यक्त करायला मी नाशिकला गेलो होतो. तिथे जाऊन काळाराम मंदिरात आरती केली. गोदातीरी आरती केली. कारण काळाराम मंदिराला सुद्धा एक वेगळा इतिहास आहे. आमचे म्हणणे आहे की, राम काही कोणाची खासगी संपत्ती नाही. राम माझा सुद्धा आहे. जे आंबेडकरांनी सांगितले तेच मी भाजपाला सांगत आहे की, राम तुमच्या मोदींची संपत्ती नाही. राम या देशातील करोडो हिंदूंचा सुद्धा आहे.

पुढे ते म्हणाले की, त्या सोहळ्यात कोणत्या तरी एका निर्बुद्ध माणसाने मोदींची तुलना आमच्या दैवताशी, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. कोणाला काय मानायचे हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी कोणाला देव मानत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण काही लोक मोदींना देव मानत असतील आणि ते त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत असतील तर ते चालणार नाही. मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत असेल तर तो बिनडोक आहे. ते कोणी असू द्यात, ते बिनडोक आहेत, अशां शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी गोविंदगिरी महाराज यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. हे सरकार मणिपूरमध्ये जात नाही, महिलांच्या अत्याचारावर बोलायला तयार नाही, त्यांची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांशी करता, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -