घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे यांचा एकला चलो रेचा नारा; २०२४ च्या विधानसभा निवडणूक तयारीला...

उद्धव ठाकरे यांचा एकला चलो रेचा नारा; २०२४ च्या विधानसभा निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींचा आढावा घेताना तुम्हाला विविध आमिषे दाखवली जातील, मात्र त्याला बळी पडू नका, असे आवाहन केले

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झालेले ४० बंडखोर आमदार पुन्हा पक्षात परतण्याची सूतराम शक्यता नसल्याने फुटीर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेची परिस्थिती मजबूत व्हावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत. याआधी पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली होती आणि जे निवडून आले होते, अशा माजी आमदारांशी मंगळवारी संवाद साधत त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश देतानाच एकला चलो रेचा नाराही उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते.

शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाला सावरण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला असून आज शिवसेनेच्या माजी आमदारांनाची बैठक बोलाविण्यात आली होती. मातोश्रीवर दुपारी ही बैठक पार पडली. या बैठकीला ३० ते ३५ माजी आमदार उपस्थित होते, अशी माहिती मिळतेय. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींचा आढावा घेताना तुम्हाला विविध आमिषे दाखवली जातील, मात्र त्याला बळी पडू नका, असे आवाहन केले.

- Advertisement -

आपण महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना मजबूत करीत शिवसेना फोडणाऱ्यांना धडा शिकवू असेही सांगितल्याचे समजते. माजी आमदारांना तयारीला लागा,संघर्षाची तयारी ठेवा, सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचे आहे असे आवाहनही त्यांनी केल्याचे समजते. आता आपल्या वारंवार बैठक होणार असून तुमचे मूळ प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याच कळते.

राजनाथ सिंह यांचा किस्सा

दरम्यान, माजी आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एक किस्सा सांगितला. राजनाथ सिंग यांनी आपल्याला फोन केला होता आणि फोनवरून ते ‘अस्सलाम वालेकुम’ असे  म्हणाले. राजनाथ सिंह यांच्याकडे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएतील घटकपक्षात समन्वय राखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार ते देशभरातील सर्व समविचारी पक्षांच्या प्रमुखांना फोन करुन एनडीए उमेदवाराला मतदान करण्याची विनंती करत होते. त्याअनुषंगाने काही दिवसांपूर्वीच राजनाथ सिंह यांनी मला फोन केला. फोनची सुरुवात करताना त्यांनी ‘अस्सलाम अलैकुम’ असे म्हटले. त्यावेळी आपण त्यांच्यावर भडकलो आणि त्यांना ‘जय श्रीराम’ असं उत्तर दिले असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितल्याचे कळते.

- Advertisement -

हेही वाचाः डिसले गुरुजींनी शाळेतील शिक्षकपदाचा दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -