मनाचा मोठेपणा! मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराचा केला अनोखा सन्मान

Uddhav Thackeray give seat to tehsildar Ravindra Sabnis
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तहसीलदार रवींद्र सबनीस

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच विधानसभेत आले. सरकार आणि प्रशासनाचा अभ्यास करु लागले. हे करत असताना त्यांनी कुठेही मोठेपणाचा आव न आणता, ‘मी अजून शिकतोय’ याची अनेकदा जाहीर कबुली दिली. मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली दौऱ्यावर होते. इस्लामपूर तालुक्यातील वाळवा तहसील कार्यालयाच्या नव्या वास्तूचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंच्या एका कृतीची चर्चा सध्या संबंध सांगलीत होत आहे.

वाळवा तहसील कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन केल्यानंतर ठाकरेंनी इमारतीचे कामकाज पाहायला सुरुवात केली. आतून इमारतीची रचना पाहत असातान तळमजल्यावरील तहसीलदारांच्या दालानाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी तहसीलदारांच्या मुख्य खुर्चीवर उद्धव ठाकरे काळी काळ बसले. मात्र त्यानंतर त्यांनी तहसीलदारांना खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. तहसीलदार रवींद्र सबनीस या आग्रहामुळे काही काळ गांगरून गेले. जिल्हाधिकारी, मंत्री, राज्यमंत्री, खासदार यांच्या सर्वांसमोर खुद्द मुख्यमंत्री आपल्याला बसायला सागंत आहेत, यावर त्यांना विश्वास बसेना.. मात्र उद्धव ठाकरेंनी सबनीस यांच्या हाताला धरून खुर्चीवर बसवलेच.

“तुम्ही या इमारतीचे प्रमुख आहात. मग ही खुर्ची तुमची आहे… तुम्ही इथेच बसा. मला तुम्हाला या खुर्चीवर स्थानापन्न करायचे आहे”, असे समजावल्यानतंर सबनीस यांनी खुर्चीचा ताबा घेतला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत सर्व मान्यवरांनी खुर्चीवर बसलेल्या सबनीस यांच्यासोबत उभे राहून फोटोही काढून घेतला. या खुर्चीवर मी स्वतः तुम्हाला बसवले असल्याने तुम्ही काम पण चोखपणे करा, असा सल्लाही द्यायला मुख्यमंत्री विसरले नाहीत.

Uddhav Thackeray give seat to tehsildar Ravindra Sabnis 1

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

मुख्यमंत्र्यांच्या या कृतीनंतर सबनीस यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. पालकमंत्री जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, सतेज पाटील, शंभूराज देशाई आणि विश्वजीत कदम असे सहा मंत्री आणि जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यासमोर मला बसायला सांगितल्यामुळे माझी पंचाईत झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आग्रहाखातर मी खुर्चीवर बसलो. आता जेव्हा जेव्हा मी या खुर्चीवर बसतो तेव्हा मला माझ्या शेजारी मुख्यमंत्री उभे आहेत, असा भास होतो, असे रवींद्र सबनीस यांनी सांगितले.