मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आज (गुरुवार, 23 जानेवारी) जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत पार पडले. यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांचा मेळावा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पार पडला. तर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा बीकेसी येथे पार पडला. शिंदेंच्या मेळाव्यात केवळ एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. तर ठाकरेंच्या मेळाव्यातही थेट उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात सुरुवातीला गायक नंदेश उमप यांच्या पोवाड्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांचा माहितीपट दाखवण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हिंदू बांधवांनो, भगिंनींनो आणि मातांना असे म्हणत भाषणला सुरुवात केली. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच भाजपा नेते, केंद्रीय मंत्री अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray warning to Amit Shah from the Andheri Melava)
आजपर्यंत आपण 23 जानेवारी हा दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवसाचा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये करत होतो, पण दोन महिन्यांपूर्वी जो काही विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. तुम्हाला विधानसभा निवडणुकीचा निकाल पटलेला आहे का? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी मला विधानसभा निवडणुकीचा निकाल पटलेला नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, मध्यंतरी अब्दाली अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणारा आहे. पण अमित शहाजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात तुम्हाला दिसेल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांना आव्हान दिले. तसेच, अमित शहांनी मराठी माणसाच्या नादाला लागू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जिथे औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शहा काय, असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच, आजची जाहीर सभा ही मुद्दामहून घेण्यात आली असल्याचे कारण सांगत उद्धव ठाकरेंनी म्हटले की, मला माझ्यासोबत कोण आहे, किती लोक राहिले, हे पाहायचे होते. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना त्यांच्यावर विश्वास आहे की नाही? असा प्रश्न विचारला. यावेळी उपस्थितांनी हात वर करत हो म्हटले. अमित शहा माझी जागा ठरवू शकत नाही. कारण माझी जागा ठरवणारे हे माझ्या वडिलांनी दिलेले शिवसैनिक असून हे शिवसैनिक माझी संपत्ती आहे. जे शिवसेना प्रमुख बोलायचे की, जो पर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात, तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे. तेच मी सांगतो की, जो तुम्ही शिवसैनिक आहात, तोपर्यंत मी तुमचा पक्षप्रमख आहे. गद्दारांनी वार केले तरी मी संपणार नाही, कारण मी गद्दारांना गाडून संपेन, असेही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले.
ज्या दिवशी माझा एक जरी निष्ठावंत शिवसैनिक मला म्हणेन की उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यामुळे तुम्ही बाजूला व्हावे, त्या क्षणी जसे मी मुख्यमंत्री पद सोडले, तसे मी माझे पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात आले. तसेच, मला खात्री आहे की, ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातील सदस्य मानतो. मला त्यांचा कुटुंब प्रमुख मानतो, तो माझा महाराष्ट्र, मुंबईकर इतक्या निष्ठुरतेने माझ्यासोबत आणि जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेसोबत वागू शकत नाही, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. हार जीत होत असते, पण ज्याप्रमाणे हा पराभव आम्हाला धक्का देणारा होता. त्याप्रमाणे हा विजय सत्ताधाऱ्यांना धक्का देणारा होता, कारण आपण जिंकलो कसे? काही तरी गडबड घोटाळा नक्की आहे, असे त्यांना सुद्धा वाटल्याचे यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले.