Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : स्वकीयांकडून भारतमातेला पुन्हा साखळदंडात जखडण्याचा प्रयत्न, ठाकरेंची घणाघाती टीका

Uddhav Thackeray : स्वकीयांकडून भारतमातेला पुन्हा साखळदंडात जखडण्याचा प्रयत्न, ठाकरेंची घणाघाती टीका

Subscribe

शिवसेना ठाकरे गटाकडून आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माँ साहेब मीनाताई ठाकरे स्मारक ते शिवसेना भवन येथे संविधान दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाकडून आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माँ साहेब मीनाताई ठाकरे स्मारक ते शिवसेना भवन येथे संविधान दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, अरविंद सावंत यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, आपले स्वकीय जर भारतमातेला पुन्हा साखळदंडात जखडणार असतील, तर ते साखळदंड तोडण्याची जबाबदारी आपली आहे आणि आपण ती स्वीकारली आहे, असा इशारा आपण देशाला जखडण्याची स्वप्ने बघणाऱ्यांना देत आहोत, असे त्यांनी म्हटले. (Uddhav Thackeray warning to the ruling party from the Constitution Day ceremony)

संविधान दिंडी सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बॅलेट पेपरद्वारे मतदान होत असताना शिक्का मारून घडी घातल्यानंतर शिक्क्याची शाई त्या उमेदवाराच्या नावालच लागत होती. त्यामुळे आपण मतदान कोणाला केले आहे आणि मत नेमके कोणाला मिळत आहे, हे समजत होते. आपण देशाचे नागरिक आहोत. संविधानाने, घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार आपण बजावला आहे, हे आपल्याला त्यावेळी समजत होते. मात्र, आता मतदान कक्षात गेल्यावर बटन दाबल्यावर दिवा पेटतो, आवाज येतो. यानंतर जसं एखाद्या प्राणासंग्रहालयात काचेआड प्राणी दाखवतात, त्याप्रमाणे काचेच्या मागून व्हीव्हीपॅटची चिठ्ठी दाखवण्यात येते. आपण सर्व बरोबर आहे, असे बघून निघतो. मात्र, ती चिठ्ठी नंतर खाली कुठे जाते ते आपल्याला माहित नाही. ती चिठ्ठी खाली मतदानपेटीत जातही असेल. पण आपले दिलेले मत आपल्याच उमेदवाराला मिळाले का? असा प्रश्न आणि शंका आपल्या मनात कायम राहते, अशी खंत ठाकरेंनी बोलून दाखवली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण दिलेले मत नेमके कोणाला गेले, हे जाणून घेण्याचा आपला अधिकार सरकारने आता हिरावून घेतला आहे. आपण व्हीव्हीपॅटची चिठ्ठी पाहतो. पण ती चिठ्ठी केराच्या टोपलीत जात असेल किंवा त्याची मोजणीच होत नसेल, तर आपण केलेल्या मतदानाचा काय उपयोग आहे? लोकशाहीत अशा मतदानाला काहीही अर्थ नाही. त्या चिठ्ठीने काहीही साध्य होत नाही. फक्त खर्च वाढत आहे. तर दुसरीकडे मतमोजणीबाबत संशय असलेल्या मतदान केंद्रीतील व्हिडीओ शूटिंग मागितले तरी ते मिळू नये यासाठी नियम करण्यात आला आहे. कारण चंदीगढमध्ये एका व्हिडीओ शूटिंगमुळे महापौर निवडीतला घोटाळा न्यायालयासमोर आला होता. एवढे महत्त्व या व्हिडीओ फुटेजला आहे. यानंतर तेथील महापौर निकाल पुन्हा नव्याने घेण्यात आले. मात्र, आता ते फूटेजच मिळणार नाही. सध्या देशात नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावले जात आहेत. या प्रकारांना पुरावे की गाडावे? हे जनतेने आता ठरवायचे आहे, असे आवाहन ठाकरेंनी जनतेला केले.

हेही वाचा – VHP : हिंदू समाजाने तीन मुले जन्माला घालावी, विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत निर्णय  

आमच्या एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात तिरंगा आहे. हे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार आहेत. तर घालीन लोटांगण, वंदीन चरण हे त्यांचे विचार नाहीत. त्यामुळे फक्त वंदन करणाऱ्यांना आणि लायकी नसताना वंदन करून घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे. संविधानासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शिवसेनाप्रमुखांचा महाराष्ट्र तत्पर आहे, हे आपण इथे उपस्थित राहून दाखवून दिले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात संविधान आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येत आहे. संविधान रक्षणाची जबाबदारी आपली आहे, हे यातून दिसून येत असल्याचे वक्तव्य ठाकरेंनी केले.

साखळदंड तोडण्याची जबाबदारी आपली

दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले की, काही जण फक्त “भारत माता की जय” असा नारा देतात. मात्र, स्वातंत्र्यापूर्वी देश जसा साखळदंडात होता. तसाच तो आता त्यांच्या साखळदंडात जखडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले स्वकीय जर भारतमातेला पुन्हा साखळदंडात जखडणार असतील, तर ते साखळदंड तोडण्याची जबाबदारी आपली आहे आणि आपण ती स्वीकारली आहे, असा इशारा आपण देशाला जखडण्याची स्वप्ने बघणाऱ्यांना देत आहोत, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा – Padma Award 2025 : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कोणाचा सन्मान?