पुरोहित मंडळाकडून उद्धव ठाकरेंना इशारा, शेंडी-जानव्याची टीका भोवणार

आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही तर राष्ट्रीय हिंदुत्व आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपवर वारंवार करण्यात येते. पण त्यांनी आता यापुढे टीका करताना याचा उल्लेख करू नये, असे जळगाव जिल्हा पुरोहित मंडळाकडून सांगण्यात आले आहे

Uddhav Thackeray was warned by Purohit Mandal

आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही तर राष्ट्रीय हिंदुत्व आहे, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्याकडून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपवर वारंवार करण्यात येते. पण त्यांनी आता यापुढे टीका करताना याचा उल्लेख करू नये, असे जळगाव जिल्हा पुरोहित मंडळाकडून सांगण्यात आले आहे. यापुढे उद्धव ठाकरे यांनी भाषणातून अपमान केल्यास सहन केला जाणार नाही, असा इशारा देखील पुरोहित मंडळाकडून देण्यात आला आहे. (Uddhav Thackeray was warned by Purohit Mandal)

हेही वाचा – राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरूच; अनिल पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा

उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रत्येक सभेत ‘शेंडी- जानव्याचे हिंदुत्व’, असा उल्लेख करत आहेत. मुळात हिंदुत्व अथवा इतर कुठल्याही मुद्यावर भाषण करताना एखाद्या धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या बाबींचा उल्लेख करण्याची गरज काय? ब्राह्मण समाजातच नव्हे, तर इतरही अनेक समाजात जानवे धारण केले जाते, शेंडी ठेवली जाते. हिंदू धर्मात या दोन्ही बाबी पवित्र मानल्या जातात. त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे असे असताना ठाकरे समस्त ब्राह्मण व हिंदू धर्माचाही अवमान करीत आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही सभेत त्यांनी शेंडी- जानव्याचा उल्लेख करू नये, अन्यथा ब्राह्मण समाज आक्रमक पवित्रा घेईल, असा इशारा पुरोहित मंडळाकडून देण्यात आलेला आहे.

याबाबत चर्चा करण्यासाठी पुरोहित मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पुरोहित मंडळाचे अध्यक्ष भूषण मुळे, राजाभाऊ जोशी, नंदू शुक्ल, अजय जोशी, गजानन जोशी, वैभव शूर, अविकुमार जोशी, प्रदीप जोशी, गिरीश जोशी, प्रसाद पिंपळे, दिनेश जोशी, मुकुंद धर्माधिकारी यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केल्यानंतर त्यांच्या हिंदुत्वाबाबत कायमच प्रश्न उपस्थित करण्यात आले. ठाकरेंवर भाजप आणि शिंदे गटाकडून टीका देखील करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी शेंडी, जानव्यांचा उल्लेख करत टीकेला प्रत्युत्तर दिले. तसेच ज्यावेळी मोहन भागवत हे मस्जिदीमध्ये तेव्हा त्यांचे हिंदुत्व कुठे जाते? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे.