बेबंदशाहीला रोखलं नाही तर…, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उद्धव ठाकरेंकडून स्वागत

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबत दिलेल्या निर्णयाचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. तर बेबंदशाहीला रोखलं नाही तर हुकूमशाही सोकावेल, असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. तसेच चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला असला तरी भाजपच्या मतांमध्ये घट होत असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Uddhav Thackeray welcomed the decision of the Supreme Court

सर्वोच्च न्यायालयाकडून आज (ता. २ मार्च) निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या निवडीबाबत महत्वपूर्ण निर्णय देण्यात आला. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची एका समितीमार्फत निवड करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असणार आहे. या निर्णयाचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील स्वागत केले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयुक्तांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. बेबंदशाहीला रोखलं नाही तर हुकूमशाही सोकावेल. आमच्याबाबतीतला निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही आणि त्याचमुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. आजपर्यंत आम्हाला सर्वोच्च न्यायालय हाच एक आशेचा किरण दिसत होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आमच्या आशेला अंकुर फुटले आहे.

उद्धव ठाकरे यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, कसबा पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या परिवारातील सदस्याला उमेदवारी नाकारुन भाजपने त्याची वापरा आणि फेका ही वृत्ती पुन्हा एकदा दिसून आली आहे. शिवसेनेलाही त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी वापरले, ममता बॅनर्जी, जयललिता, आकाली दल यांचाही भाजपने त्यांची गरज होती तोपर्यंत वापर केला आहे आणि नंतर फेकून दिले. ही भाजपची वापरा आणि फेकून द्या ही नीती जनतेच्या लक्षात आली आहे. त्याचाच परिणाम कसबा पोटनिवडणुकीत दिसून आला आहे. गिरीश बापट हे आजारी असताना त्यांना प्रचारात उतरवले, मात्र त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्याचे टाळले, हे सर्व जनता पाहात होती. याचाच एकत्रित परिणाम कसबा पोटनिवडणुकीत दिसून आला आहे.

हेही वाचा – निवडणूक आयोगाबद्दलचा सुप्रीम कोर्टाचा ‘तो’ निर्णय उद्धव ठाकरेंना बळ देणारा!

स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडी एकत्र राहील. तसेच ज्याप्रमाणे चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये मतांची फाटाफूट झाली, तसे भविष्यात होऊ न देण्याचे आमचे काम आहे, असेही उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, पोटनिवडणूक जिंकल्यानंतर एका भ्रमातून कसबा मतदारसंघ जर बाहेर पडला असेल तर देश बाहेर पडायला वेळ लागणार नाही, तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला असला तरी भाजपच्या मतांमध्ये घट होत आहे, असे उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे.