उद्धव ठाकरेच पुढील २५ वर्षे मुख्यमंत्री

सुप्रिया सुळेंच्या नवसावर संजय राऊत यांचा दावा

NCP MP Supriya sule reaction on shivsena mp sanjay raut Press conference

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास अख्खा पक्ष घेऊन दर्शनाला येईन, असा तुळजाभवानीच्या चरणी नवस करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर देत शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी मुख्यमंत्री बदलाच्या शक्यता फेटाळून लावल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रिपदावरून काहीजणांकडून संभ्रम निर्माण केले जात आहेत, मात्र पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असे निक्षून सांगतानाच सुप्रिया सुळे यांनी स्वत: ही पुढची २५ वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असे म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून निर्माण करण्यात येणार्‍या संभ्रमांकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

संजय राऊत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करीत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सगळेच जण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश आहेत. त्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

तर, महिला मुख्यमंत्रीच करायच्या असतील तर रश्मी ठाकरे सज्ज आहेत. त्यांना राजकारणाचा दांडगा अभ्यास आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी महाराष्ट्राच्या सगळ्या मंदिरांमध्ये आधीच पूजा झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २५ वर्षे मुख्यमंत्रिपदी राहतील. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री कोणत्या तारखेला होणार याबद्दल मी बोलणे योग्य होणार नाही. २५ वर्षांनंतर त्यांचा नंबर लागावा हीच ईश्वरकडे आमची प्रार्थना आहे, असे मत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

मराठवाडा दौर्‍याचा शेवट करताना सुप्रिया सुळे यांनी रविवारी तुळजाभवानीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणुकीत अंबाबाईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास संपूर्ण पक्ष घेऊन दर्शनाला येईन, असा देवीला नवस केल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

भविष्यातील मुख्यमंत्री भाजपचाच- प्रवीण दरेकर
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला किंवा महिला मुख्यमंत्री झाल्यास संपूर्ण पक्ष घेउन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असा नवस सुप्रियाताईंनी केला. आता त्याचा विचार त्यांच्या सहयोगी पक्षाने करावा. आम्ही काही त्यांचा सहयोगी किंवा मित्रपक्ष नाही. त्यांचा नवस पूर्ण होणार कसा? कारण भविष्यातील मुख्यमंत्री भाजपचाच असेल. त्यामुळे कुणीही स्वप्न बाळगायला हरकत नाही, असे वक्तव्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.