उद्धव ठाकरे खेडमध्ये जाहीर सभा घेणार, मातोश्रीवर शिवसैनिकांनी घेतली भेट

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गेल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपला पहिला दौरा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये करणार आहेत. खेड हा माजी मंत्री रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानला जात असून ठाकरे हे ५ मार्च रोजी खेडमधील होळी मैदानात जाहीर सभा घेणार आहेत.

खेड-दापोलीतील शिवसैनिकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हा आपला दौरा जाहीर केला. यावेळी या दौऱ्याविषयी कार्यकर्त्यांना अटी टाकताना मैदान अपुरे पडायला हवे एवढी गर्दी सभेला व्हायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार भास्कर जाधव, माजी खासदार अनंत गीते यांच्यासह मोठ्या संख्येने कोकणातील कार्यकर्ते आज मातोश्रीवर आले होते. या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज मी तुम्हाला तीन अटी घालणार आहे. पहिली अट म्हणजे खेड हा आपला मतदारसंघ आहे, तो आपलाच राहायला हवा. दुसरी अट म्हणजे इथल्या इच्छुकांची तयारी झाली आहे का? आणि तिसरी अट म्हणजे ५ मार्चला मैदान अपुरे पडेल एवढी गर्दी व्हायला हवी. यावर कार्यकर्त्यांनी हो असे एकमताने उत्तर दिले.

सभेच्या दुसऱ्या दिवशी शिमगा आहे, त्यांचा शिमगा रोजचाच आहे. त्यांना बोंबलायला लावू. तुमचा उत्साह दांडगा आहे. या सभेकडे पूर्ण देशाचे लक्ष असणार आहे, कारण पहिली सभा आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी घ्या. सर्वसामान्य लोक मैदानात येणार आहेत. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर कांदा-भाकरी घेऊन शिवसैनिक आले होते, ही आपली ताकद आहे. राहिलेला कांदा त्यांच्या नाकाला लावूया, असा टोलाही ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला नाव न घेता लगावला.


हेही वाचा : मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून रवींद्र धंगेकरांना रसद, राज ठाकरेंचा मोठा