ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल. भाजपला ही पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. फक्त इथे नाही, देशभरात हाच प्रकार सुरू आहे, असं मत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. याला प्रत्युत्तर देताना अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे.
उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात छुपी रणनीती सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील नेतृत्त्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारणार आहेत, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : सैफच्या घरातील अन् अटकेत असलेल्याचे फिंगरप्रिंट जुळत नाहीत? फडणवीस म्हणाले, मी स्पष्ट करतो की…
संजय राऊतांनी काय म्हटले?
“एकनाथ शिंदे यांच्या गटात नवा उदय होणार आहे. मला कुणाचे नाव घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल. भाजपला ही पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. फक्त इथे नाही, देशभरात हाच प्रकार सुरू आहे. चंद्राबाबूंचा पक्षही तोडला जाईल. नितीश कुमारयांचा पक्षही तोडला जाईल. त्यांच्या दाताला, जिभेला रक्त लागलं आहे. ही चटक आहे, तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण सुरू राहील,” असं राऊत म्हणालेले.
रवी राण काय म्हणाले?
याला उत्तर देताना रवी राणांनी म्हटलं, “संजय राऊत यांना कल्पना नाही. ते आधी सुद्धा अंधारात होते. आता सुद्धा राऊत अंधारात आहेत. उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोठ्या प्रमाणाता छुपी रणनीती सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारतील.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील नेतृत्त्व उद्धव ठाकरे येणाऱ्या काळात स्वीकारणात आहेत. त्या गतीविधीने उद्धव ठाकरेंनी पाऊल टाकणे सुरू केले आहे. उद्धव ठाकरे भाजपसोबत दिसतील; तेव्हा राऊतांना मोठा झटका बसणार आहे,” असेही राणा म्हणाले.
हेही वाचा : शिंदे गटात नवा ‘उदय’ होणार, राऊतांच्या दाव्यावरून सामंतांनी सुनावले; म्हणाले, असे चाळे…