घरमहाराष्ट्रनाणार आठवतेय ना,आरेचेही तेच होणार!

नाणार आठवतेय ना,आरेचेही तेच होणार!

Subscribe

उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

आरे दुग्ध वसाहतीमधील झाडे मेट्रोे कारशेडसाठी कापण्यास शिवसेनेचा विरोध कायमच आहे. पर्यावरणप्रेमींच्या पाठीशी शिवसेना उभी असून जे नाणारचे झाले तेच आरेचेही होईल, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. ‘नाणार आठवतेय ना, त्याला जसं हटवलं तसंच आरेचही होणार, काळजी नसावी’ तसेच राम मंदिरची पहिली वीट आम्हीच रचू असा दावाही त्यांनी केला. आरेच्या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुखांनी प्रथमच भूमिका जाहीर केली आहे. आरेविरोधात शिवसेना ताकदीनिशी उतरणार असून त्यामुळे सेना-भाजपत ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे.

आरे येथे उभारण्यात येणार्‍या मेट्रो-३च्या प्रकल्पाच्या प्रस्तावित कारशेडसाठी तब्बल २६०० झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींसह सामान्य मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी आरेतील झाडे कापण्यास शिवसेनेचा विरोध कायमच असल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisement -

नाणार प्रकल्पाचाही असाच आग्रह धरण्यात आला होता. त्याचे काय झाले, ते तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे जे नाणारचे झाले, तेच ‘आरे’चे होणार, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला विरोध केला. शिवसेनेच्या विरोधानंतर कोकणात उभारण्यात येणारा नाणार प्रकल्प रद्द करण्यात आला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, शिवसेनेकडून कोण कुठल्या जागेसाठी इच्छुक आहे, कोणत्या जागेसाठी मुलाखती सुरू आहेत याची माहिती अद्याप मला नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा मी आढावा घेईन, असे ठाकरे म्हणाले. भाजपसोबतच्या युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी विधानसभेच्या सर्व जागांसाठी शिवसेनेची तयारी सुरू असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

- Advertisement -

राम मंदिरसाठी किती थांबायचे
राम मंदिर हा आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. हा प्रश्न आम्ही सोडणार नाही. अयोध्येत राम मंदिरासाठी पहिली वीट रचण्याचे कामही आम्हीच करू. आता हा प्रश्न अधिक काळ रेंगाळत ठेवता कामा नये. १९९० पासून हा प्रश्न प्रलंबित आहे. किती काळ थांबायचे? राम मंदिरसाठी आता थांबायला वेळ नाही. न्याय देवतेने लवकरात लवकर निर्णय द्यावा. निर्णय यायला उशीर लागत असेल तर केंद्र सरकारने विशेष कायदा तयार करावा. काश्मीर प्रश्नासाठी जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच राम मंदिरसाठी धाडसी पाऊल उचलावे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आजच्या ‘सामना’तील अग्रलेखाबाबतही भूमिकाही स्पष्ट केली. उदयनराजे यांचा अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही. त्यांच्याकडून काही अपेक्षा होत्या त्याच अग्रलेखात मांडण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या त्यांनाच सांगणार ना? असाही प्रति सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

ओला, उबेरमुळे बेस्टचेही नुकसान
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओला, उबेरमुळे वाहन विक्री घटल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून देशभरात टीका झाली असताना शिवसेना पक्षप्रमुख यांनी एक वेगळाच शोध लावला आहे. ओला, उबेरमुळे बेस्टचेही नुकसान झाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -