Homeक्राइमUjjwal Nikam : कल्याणचा खटला उज्ज्वल निकम लढणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश

Ujjwal Nikam : कल्याणचा खटला उज्ज्वल निकम लढणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश

Subscribe

कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचे घटनेने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचा खटला आता ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम लढणार आहेत.

मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातही ठाणे जिल्ह्यात अशा घटना सर्वाधिक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी बदलापुरातील एका शाळेत तीन ते चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. ज्यानंतर या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. या घटनेचे पडसाद कमी होत नाही तेच आता कल्याण येथे एका 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हृहय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणातील प्रमुख आरोपी विशाल गवळी हा पोलीस कोठडीत आहे. परंतु, या प्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे या खटल्याची बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Ujjwal Nikam will fight Kalyan case CM Devendra Fadnavis ordered)

कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचे घटनेने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, याची सुनिश्चिती करा, असे आदेश दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु, आता गृहमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी मोठे पाऊल उचलत हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवला आहे. तर, ठाणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात 30 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावे, असे आदेशही फडणवीस यांनी दिले आहेत. पीडित मुलगी ही मला माझ्या मुलीसारखी आहे. तिला न्याय मिळून देणे माझी जबाबदारी आहे. चार महिन्यांच्या आत आरोपीला कठोर शिक्षा होईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिले आहे.

हेही वाचा… Santosh Deshmukh Murder : मातीआड गेलेले माझे वडील…, बीडमधील मोर्चात वैभवीची भावनिक साद

कल्याणमधील 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केलेला आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी बुधवारी (ता. 25 डिसेंबर) बुलढाण्यातील शेगाव येथून सलूनमधून अटक केली. त्यानंतर या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत थेट ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता. तर, कल्याणमधील घटना गंभीर आहे. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला अटक झाली आहे. त्यामुळे आता हा खटला जलदगती न्यायालयात चालवा. आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे थेट गृहमंत्री यांनीच आदेश दिल्याने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे विशाल गवळी याच्यावर जलदगतीने कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.