आधी मतदान मग लग्न, नवरीने मतदानापर्यंत वऱ्हाड थांबवून ठेवले

ulhasnagar bride first did voting and then go for marriage
उल्हासनगरमध्ये नवरीने आधी केले मतदान मग लग्नासाठी झाली रवाना

उल्हासनगर येथे राहणाऱ्या तरुणीचे आज लग्न आहे. लग्नासाठी तिला नाशिकला रवाना व्हायचे होते, मात्र तिने लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आणि मग नाशिकसाठी वऱ्हाडासोबत रवाना झाली. उल्हासनगर – ४ येथील धोबीपाडा परिसरात राहणाऱ्या सायली महेंद्र रणपिसे हिचे आज नाशिक येथे राहत असलेल्या अभिजित जाधव यांच्यासोबत लग्न होणार आहे. लग्नाची वेळ ११.३० वाजताची होती. सायलीला नातेवाईकांसह सकाळी लवकर निघायचे होते. दारासमोर वऱ्हाडाला घेऊन जाणारी बस तयार होती. तत्पूर्वी सायलीने सकाळी ८ वाजता मतदान केंद्र गाठले.

यावेळी सायली नवरीच्या पेहरावात होती. तिचे वडील महेंद्र रणपिसे आणि आईसोबत उल्हास विद्यलयातील मतदान केंद्रावर बूथ क्रमांक ३०९ मध्ये गेली. यावेळी मतदान केंद्रातील कर्मचारी, पोलीस आणि मतदार सायलीकडे कुतूहलाने बघत होते. मतदान केल्यानंतर सायली म्हणाली की माझे हे उल्हासनगरला शेवटचे मतदान आहे. आता यापुढे मी नाशिककर होत असल्याने तिथे देखील न चुकता मतदानाचा हक्क बजावणार आहे.

आज देशभरातील ९ राज्यांमध्ये ७१ मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्याचे मतदान होत आहे. तर महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्याचे १७ मतदारसंघात मतदान होत आहे. मे महिना म्हटला की लग्नसराईचा काळ. उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नाच्या मुहुर्तामुळे या महिन्यात अनेक लग्न असतात. त्यातच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आल्यामुळे अनेकांची लग्न मतदानाच्या दिवशीच आली आहेत. मात्र सायलीसारखे काही सजग मतदार आपले लोकशाहीचे कर्तव्य बजावल्यानंतरच यंदा कर्तव्य आहे, असे म्हणत आहेत.