घरमहाराष्ट्रUlhasnagar firing : गुन्हेगारांचे राज्य गुन्हेगारांसाठी चालवले जात आहे, ठाकरे गटाचा घणाघात

Ulhasnagar firing : गुन्हेगारांचे राज्य गुन्हेगारांसाठी चालवले जात आहे, ठाकरे गटाचा घणाघात

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य गुन्हेगारांसाठी चालवले जात आहे आणि त्यास दिल्लीचा खुला आशीर्वाद आहे. जिल्ह्याजिल्ह्यांत संघर्ष, खुनाखुनीचा खेळ रंगला आहे. महाराष्ट्रात पोलीस ठाणीही सुरक्षित नसतील तर मग काहीच सुरक्षित नाही. कायदा आणि सुव्यवस्था गुंडांच्या अड्ड्यावर कचरा काढत आहे. पोलीस ठाण्यांवरच हल्ले करणे, पोलीसप्रमुख, जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्या घडवणे हे मिर्झापुरी राजकारण उत्तर प्रदेश, बिहारात अनेकदा घडते. आता हे प्रकार महाराष्ट्रात घडू लागले आणि या भयानक गुन्हेगारी संघर्षाचे सूत्रधार स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Khadse Vs Mahajan : ‘या’ कारणामुळे एकनाथ खडसेंच्या मालमत्तेचा होऊ शकतो लिलाव; गिरीश महाजनांची माहिती

- Advertisement -

शिंदे मुख्यमंत्री असतील तर राज्यात फक्त गुन्हेगारांचीच पैदास होईल, असा आरोप करून भाजपाचे ज्येष्ठ आमदार गणपत गायकवाड हे तुरुंगात गेले आहेत. उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे गँगचा सदस्य महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात शिंदे गँगचे दोन सदस्य जखमी झाले. स्वतः मुख्यमंत्री हे आपल्या गँगच्या जखमींना पाहण्यासाठी इस्पितळात गेले आणि हळहळले, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाद्वारे केली आहे.

‘‘आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगार केले,’’ असे आमदार गायकवाड यांनी सांगितले. पोलिसांनी गायकवाड यांचा हा कबुलीजबाब गांभीर्याने घ्यायला हवा. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या बाळराजांनी ठाणे-कल्याणसह संपूर्ण राज्यात गुंडगिरीचा धुडगूस घातला आहे. ठेकेदारी, अपहरण, खंडणी, धमक्या, हत्या, जमिनींचा कब्जा घेणे असे गुन्हे सरकारी आशीर्वादाने घडत आहेत आणि आपल्या गँगच्या लोकांना या कामात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक केली आहे, असा आरोप ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray On Rane : कोंबडी चोर, लायकी, डबडी अन बरंच काही; राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडली

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हे गँगवॉर संपूर्ण देशाने पाहिले. त्यामुळे ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाहिलेच असेल. इतक्या भयंकर घटनेवर त्यांची अद्यापि प्रतिक्रिया नाही. बिगर भाजपशासित राज्यात मुंगी पादली तरी या मंडळींची प्रतिक्रिया येते, पण महाराष्ट्रात शहा-मोदी यांनी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने गुंडगिरी, रक्तपात सुरू आहे. त्यावर हे ‘संस्कार भारती’ तोंड उघडायला तयार नाहीत, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -