घरमहाराष्ट्रUlhasnagar Firing : थप्पड ते गोळीबार... राज्य सरकारची दीड वर्षातील कामगिरी

Ulhasnagar Firing : थप्पड ते गोळीबार… राज्य सरकारची दीड वर्षातील कामगिरी

Subscribe

मुंबई : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे ठाणे शहर हादरले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींच्या अरेरावीच्या घटना वारंवार घडतच आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या दीड वर्षांच्या काळात अशा घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र वारंवार हादरत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Ulhasnagar Firing : भाजपा आणि शिंदे गटाच्या दिलजमाईची चर्चा माखली रक्ताने…

- Advertisement -

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाण्यासह राज्यभरात शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये वरचेवर हमरीतुमरी होत असली तरी, सत्ताधाऱ्यांकडून हाणामारी, अपहरण, शिवीगाळ असले प्रकार सुरूच आहेत. पण आता तर अगदी एखाद्यावर जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

आमदाराच्या रडारवर उपहारगृह व्यवस्थापक ते प्राध्यापक

मारहाणीच्या घटनांमध्ये आघाडीवर आहेत ते शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर. अगदी शेवटच्या क्षणी शिंदे गटात प्रवेश करणारे आमदार म्हणून संतोष बांगर अशी ओळख बनली. पण शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन दीड महिना होत नाही तोच, कामगारांसाठीच्या मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना जेवणाचे डबे पुरवणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला. लोकांना निकृष्ट दर्जाचे अन्न खाऊ घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यापाठोपाठ शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनाही त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले. महिला प्राध्यापकांना हे प्राचार्य त्रास देत असल्याची तक्रार आमदार बांगर यांच्याकडे आली होती, असे सांगण्यात येते. याशिवाय, 10-12 कार्यकर्त्यांना मंत्रालयात घेऊन जात असताना गेटवरील पोलिसांशी हुज्जत घातली आणि त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही बांगर यांच्यावर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Nana Patole : गुन्हेगारांचा बाप ‘सागर’ बंगल्यात राहतो का? नाना पटोले यांचा सवाल

गोळीबार करणारा आणखी एक लोकप्रतिनिधी

शिंदे गटाचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलेला नाही तर, शिंदे गटाचेच आमदार सदा सरवणकर यांच्यावरही गोळीबार केल्याचा आरोप झाला आहे. सप्टेंबर 2022मध्ये प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला होता आणि त्यातूनच आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. तथापि, सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाला, पण तो त्यांनी केला नसल्याचे पोलीस अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आमदारपुत्राविरोधात अपहरणाची तक्रार

मुंबईतील गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार सिंह यांना मारहाण करून अपहरण केल्याची घटना गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये घडली होती. पीडित राजकुमार सिंह यांनी दिलेल्या तक्रारीवरून वनराई पोलीस ठाण्यात स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा – Sanjay Raut: आजच्या प्रकारानंतर गृहमंत्र्यांना उत्तर द्यायला तोंड उरलंय का? राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

भाजपा आमदारही मागे नाहीत

पोलीस काँस्टेबलच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी पुण्यातील भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातील एक कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरून खाली उतरताना सुनील कांबळे यांनी पोलीस काँस्टेबल शिवाजी सरक यांच्या कानशिलात लगावली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

इतरांचेही वर्तन आक्षेपार्ह

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे धाराशीवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी कथितरीत्या उर्मटपणे बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात तानाजी सावंत हे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना आजच ऑर्डर का़ढा, असे सांगताना दिसत होते. त्यावर कुलकर्णी यांनी, डिस्कस करू, असे म्हटल्यावर, नो डिस्कस, मी सांगितले तर करायचे म्हणजे करायचे, मी मुख्यमंत्र्यांचे असले काही ऐकत नसल्याचे तानाजी सावंत म्हणाले होते.

हेही वाचा – Supriya Sule : केंद्र सरकारने राज्य सरकार बरखास्त करावं, सुप्रिया सुळे यांची मागणी

तर, शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांची नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयामधील दादागिरी देखील समोर आली होती. ऑक्टोबर 2023मध्ये या रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांना विविध ठिकाणी अस्वच्छता दिसली. त्यामुळे संतापलेल्या खासदार पाटील यांनी थेट रुग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह साफ करायला लावले होते.

गायक सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्फेकर याच्याविरोधात फेब्रुवारी 2023 चेंबूर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेंबूरमधील लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू निगमला धक्काबुक्की करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -