घरमहाराष्ट्ररुग्णालयांना सोमवारपर्यंत अल्टिमेटम-आयुक्त चहल

रुग्णालयांना सोमवारपर्यंत अल्टिमेटम-आयुक्त चहल

Subscribe

करोना मृत्यूंची नोंद महापालिकेकडे न केल्यास कारवाई

करोना मृत्यूची नोंद मुंबई महपालिकेकडे करण्याच्या आदेशाला वीस दिवस उलटत आले तरी मुंबईतील रुग्णालयांकडून या रुग्णांची महापालिकेकडे नोंद करण्यात आलेली नाही. या रुग्णालयांनी बाधित रुग्णाच्या मृत्यूंची माहिती महापालिकेला कळवण्यास टाळाटाळ करत एकप्रकारे आयुक्तांच्या आदेशालाच हरताळ फासला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी शेवटची संधी देत येत्या सोमवारी २९ जून २०२० रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अशा रुग्णांच्या मृत्यूची माहिती कळवावयाचे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिले. या कालावधीत माहिती न दिल्यास रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात आयोजित या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त, वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी, महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता व महापालिका सेवेतील डॉक्टर मंडळी यांच्यासह पालिकेचे अतिवरिष्ठ अधिकार्‍यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे करोनाच्या संसर्गजन्य आजाराशी विविध विषयांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान करोना बाधेने दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची माहिती काही प्रकरणी खासगी रुग्णालयांद्वारे ४८ तासांच्या मुदतीत महापालिकेकडे कळविली नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता महापालिका आयुक्तांनी सदर प्रलंबित माहिती महापालिकेकडे २९ जून २०२० रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कळविण्याची अंतिम संधी दिली आहे.

- Advertisement -

तसेच याबाबत वारंवार संधी देऊनही सदर माहिती न कळणार्‍या रुग्णालयांवर यापुढे ‘साथरोग नियंत्रण कायदा १८९७’अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असेही महापालिका आयुक्तांनी नमूद केले. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या कोविड बाधित रुग्णांना अधिक परिणामकारक वैद्यकीय उपचार मिळावेत.

याकरिता दर महिन्याला आवश्यक असणार्‍या औषधांची गरज लक्षात घेऊन टोसिलिझुमॅब, रेमडेसीवीर यासारख्या आवश्यक त्या औषधांचा महिन्याभरासाठीचा अग्रीम व पुरेसा साठा रुग्णालयांनी आपापल्या स्तरावर संबंधित प्रक्रियेनुसार उपलब्ध करून घ्यावा, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी या बैठकीदरम्यान महापालिका रुग्णालयांना दिले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित औषधे तयार करणार्‍या उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून थेटपणे औषधांची उपलब्धता करून घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती प्रक्रिया व कार्यवाही करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -