घरमहाराष्ट्रगोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर अकोला पश्चिमच्या पोटनिवडणुकीबाबत अनिश्चितता; काय आहे कारण?

गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर अकोला पश्चिमच्या पोटनिवडणुकीबाबत अनिश्चितता; काय आहे कारण?

Subscribe

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीबाबत अनिश्चितता आहे. भारत निवडणूक आयोगाने पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक टाळली. त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक टाळली जाऊ शकते. तथापि, निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार याविषयी संभ्रमावस्था आहे. (Uncertainty over Akola West by election after Govardhan Sharma death What is the reason)

लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 151 (ए) नुसार लोकसभा अथवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यास सहा महिन्यांच्या मुदतीत पोटनिवडणूक घेणे बंधनकारक आहे. मात्र, अशी पोटनिवडणूक घेताना सभागृहाची मुदत एक वर्ष शिल्लक असावी लागते. गोवर्धन शर्मा यांचे 3 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झाले. शर्मा यांचे निधन झाल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने अकोला पश्चिम विधानसभेची जागा रिक्त झाल्याची माहिती दिल्लीत आयोगाला दिली.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांनी घेतलं ओबीसी प्रमाणपत्र? कथित जातीचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल, काय आहे प्रकरण…

चौदाव्या महाराष्ट्र विधानसभेची मुदत पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात संपणार आहे. सभागृहाची मुदत एक वर्षापेक्षा कमी राहिल्याने अकोला पश्चिमची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता कमी आहे. मात्र, निवडणूक आयोगाने साडेनऊ वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल 2014 मध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबत घेतली होती. त्यावेळी काँग्रेस आमदार सुभाष झनक यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाला आवश्यकता वाटल्यास अकोला पश्चिमची पोटनिवडणूक होऊ शकते.

- Advertisement -

भाजपाचे गिरीश बापट आणि काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे अनुक्रमे पुणे, चंद्रपूर लोकसभेची जागा सध्या रिक्त आहे. यापैकी बापट यांचे 29 मार्च 2023 रोजी तर, धानोरकर यांचे 30 मे 2023 रोजी निधन झाले होते. विद्यमान सतराव्या लोकसभेची मुदत पुढील वर्षी जूनमध्ये संपत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार पुणे लोकसभा मतदारसघांची पोटनिवडणूक सप्टेंबर अखेर अपेक्षित होती. मात्र, निवडणूक आयोगाने पुण्याची पोटनिवडणूक घेणे टाळले. पुण्याचा निकष चंद्रपूर लोकसभा मतदारसंघालाही लावला गेला. त्यामुळे पुणे, चंद्रपूर लोकसभेप्रमाणे अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक  देखील टाळली जाऊ शकते.

हेही वाचा – Jalna : गावबंदीचे पोस्टर फाडल्याने दोन गटांत तुंबळ हाणामारी; मनोज जरांगेंकडून कारवाईची मागणी

15 डिसेंबरला अहमदाबादला बैठक

दरम्यान, पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने येत्या 15 डिसेंबरला अहमदाबाद येथे पश्चिम विभागातील राज्यांची बैठक आयोजित केली आहे. उप मुख्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आदी राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य पोलीस नोडल अधिकारी उपस्थित राहतील. बैठकीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहीती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -