घरमहाराष्ट्रअंमलीपदार्थाविरोधात ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम हाती घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

अंमलीपदार्थाविरोधात ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम हाती घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Subscribe

मुंबई : मुंबई अंमलीपदार्थमुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत सुमारे 7 कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून आठवडाभरात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणांहून 350पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. या मोहिमेला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मिशन थर्टी डेज’ (Mission Thirty Days) मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी संबंधितांना दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ‘अंमलीपदार्थमुक्त मुंबई’चा (Drug free Mumbai) आढावा घेण्यात आला. अंमलीपदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी बरबाद होत असून त्यापासून त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घ्या. अंमलीपदार्थांची विक्री, पुरवठा करणाऱ्यांवर धडक कारवाई करा. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील पान ठेल्यांवर कारवाई करून व्यसनाच्या दुष्परिणामाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

- Advertisement -

अंमलीपदार्थ निर्मितीचे कारखाने उद्ध्वस्त करा. मुंबई महानगरातील विद्यालयांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून अंमलीपदार्थविरोधी मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. अंमलीपदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अंमलीपदार्थमुक्त मुंबई करतानाच राज्यात इतरत्र देखील त्याची विक्री होत आहे का, हे तपासा आणि त्यानुसार दक्ष राहून कारवाई करावी. तसेच, जनजागृतीसाठी अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क या विभागांची एकत्रित बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

- Advertisement -

गेल्या आठवडाभरात मुंबई पोलीस, मुंबई महापालिका यांच्यावतीने अंमलीपदार्थांची विक्री करणारे पान ठेले, हॉकर्स, रेल्वे स्थानकांवरील हॉकर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा आणि महाविद्यालयाजवळील सुमारे 1371 पान ठेल्यांवर कारवाई करून हटविण्यात आले आहेत. ‘कोटपा’ कायद्यांतर्गत ई-सिगारेटसप्रकरणी 7391 जणांवर कारवाई झाली आहे. पदपथावरील 6263 हॉकर्स आणि रेल्वे स्थानकांवरील 2819 हॉकर्स विरुद्ध देखील या मोहिमेअंतर्गत कारवाई झाली आहे.

गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -