मिशन 150 : मुंबईवर भाजपाचे वर्चस्व असावे; अमित शाहांचा शिंदे गटालाही शह

"मुंबईतल्या राजकारणावर फक्त भाजपाचे वर्चस्व असावे. मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होणार'', असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत केले आहे. मात्र अमित शाहांच्या या वक्तव्यामुळे भाजपासोबत युती केलेल्या शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

amit shah

“मुंबईतल्या राजकारणावर फक्त भाजपाचे वर्चस्व असावे. मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होणार”, असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. मात्र, अमित शाहांच्या या वक्तव्यामुळे भाजपासोबत युती केलेल्या शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिंदे गटाचे वर्चस्व टिकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच, “तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे”, अशा शब्दांत अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पाडली. ‘मेघदूत’ बंगल्यावर मुंबईतील भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी संबोधित करताना ‘मिशन 150’ असे म्हणत महापालिका निवडणुकीच्या तयारीचा नारळ फोडला. यावेळी अमित शाह यांनी “मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होईल. प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आला पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व फक्त भाजपाचे असावे”, असे वक्यव्य केले. एकिकजे भाजपा आणि शिवसेनेचा वाद कायम आहे. मात्र दुसरीकडे नुकताच शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपाशी युती करत राज्याच सरकार स्थापन केलेल्या शिंदे गटाला भाजपा योग्य वागणूक देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण सध्या महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आहे, मात्र अमित शाहांनी केलेल्या वक्तव्यावरून महापालिका निवडणुकीत भाजपा शिंदे गटाला शह देत असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी पुकारल्यानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपाशी युती करा, असे सांगितले होते. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या आणखी आमदारांनी शिंदे गटात सहभाग घेतला. परंतु, अमित शाहांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गट महापालिका निवडणुकीत किती जागांवर वर्चस्व मिळवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, अमित शाह यांनी लालबागचा राजाच्या दर्शनाने मुंबई दौऱ्याचा शुभारंभ केला.

शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला : अमित शाह

दरम्यान या बैठकीला संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. 2019 मध्ये पहिल्यांदा भाजपचं संपूर्ण बहुमताचे सरकार आणले, असे पहिल्यांदाच झाले. 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, असे अमित शाह यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली : अमित शाह

“महाराष्ट्रातले हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचं असल्याचे सांगत शाह यांनी भाजपच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे. आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली”, असेही अमित शाह यांनी सांगितले.

पुढील चार महिन्यात मुंबई महापालिकांचे बिगुल वाजणार असून, शिवसेना-भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राज्यातले ठाकरे सरकार उलथवल्यानंतर आता भाजपने थेट मुंबई पालिकेवरच लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई पालिकेचे वर्षाचे बजेट 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.