मालेगाव (नाशिक) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सहकार आणि कृषी खात्यावरुन शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार 10 वर्षे केंद्रीय कृषीमंत्री होते. मात्र महाराष्ट्रातील साखर कारखाने, सहकार क्षेत्रासाठी त्यांनी काय केले? असा सवाल करत त्यांनी शरद पवारांना मार्केटिंग नेता म्हणून टोला लगावला आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग गावी ते वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले आहेत. यावेळी त्यांनी संस्थेच्या काजू प्रक्रिया युनिट आणि माती तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी सहकार, कृषी खात्यावर शरद पवारांवर टीका केली आहे.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून सहकार क्षेत्रातील लोक सहकार मंत्रालयाची स्थापना करण्याची मागणी करत होते. त्यांचं कोणीही ऐकलं नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आले. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा 46 हजार कोटी रुपयांचा कर कमी करण्याचे काम आमच्या सरकारने केले असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
पवाह साहेब महाराष्ट्राला हिशेब द्या….
शरद पवारांवर टीका करताना अमित शहा म्हणाले, अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या करावरून वाद सुरु होता. आमच्या सरकारने हा प्रश्न सोडवला. आज सहकार संमेलनाच्या निमित्ताने शरद पवारांना विचारू ईच्छितो की, तुम्ही दहा वर्षे देशाचे कृषी मंत्री होते. त्यावेळी सहकार क्षेत्र तुमच्या मंत्रालयांतर्गत होते. महाराष्ट्राच्या जनतेला जरा हिशेब द्या. तुम्हा कृषी मंत्री असताना सहकार क्षेत्रासाठी काय केले? असा खोचक सवाल अमित शहांनी केला. ते म्हणाले की, साखर कारखान्यांसाठी तुम्ही काय केले, कांद्यासाठी तुम्ही काय केले? शेतकऱ्यांसाठी काय केले? पवार साहेब फक्त मार्केटिंग नेता होणं पुरेसं नाही, तर जमिनीवर काम करावं लागतं. आमच्या सरकारने इथेनॉलची योजना आणली, टॅक्सचा प्रश्न सोडवला. मात्र आज मी येथे राजकारण करण्यासाठी आलो नाही. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्याचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांनी संयमाने आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे,” असा सल्लाही त्यांनी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिला.
यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन उपस्थित होते.
हेही वाचा : Supriya Sule : शरद पवारांच्या निवृत्तीवर सुप्रिया सुळेंनी केलं महत्त्वाचं विधान; कोल्हापूरमध्ये म्हणाल्या…