केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

Union Minister Narayan Rane surgery uccessful Doctors informed condition was stable
केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ह्रदयासंदर्भातील त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. नारायण राणे नियमीत वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात येत असतात. नारायण राणे यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हृदयविकाराचा त्रास आहे. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली असून शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रुटीन चेकअपसाठी ते आज लीलावती रुग्णालयात गेले होते. यावेळी तपासणीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये काही ब्लॉकेजेस आढळले होते. यामुळे लगेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नारायण राणे यांच्या ह्र्दयासंदर्भातील शस्त्रक्रियेदरम्यान एक स्टेन टाकला गेला आहे. यानंतर आणखी एक स्टेन टाकण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शस्त्रक्रियेनंतर नारायण राणेंची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणताही त्रास होत नाही आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. नारायण राणे महाविकास आघाडीविरोधात टीका करत असतात. राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरकारभारावरुन राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नेहमीच शरसंधान साधत असतात. शिवसेनेवरसुद्धा नारायण राणे टीका करत असतात. नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद राणेंच्या मुंबईतील अधिश बंगल्यावरील कारवाईदरम्यानसुद्धा चव्हाट्यावर आला होता.


हेही वाचा : संभाजीराजेंविरोधात भूमिकेनंतर संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर, पक्षाच्या बैठकांना लावणार हजेरी