जळगाव : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या सध्या मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बऱ्हाणपूर मतदारसंघाच्या भाजपच्या समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे त्या सध्या तिथेच असतात. परंतु, काल (ता. 09 नोव्हेंबर) मध्य प्रदेशातील प्रचारानंतर त्या जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींना भेटल्या. यावेळी त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमादरम्यानच्या वर्गमैत्रीण डॉ. सुचिता कुयटे यांच्या रावेर येथील निवासस्थानी सायंकाळी उशिरा भेट दिली. यावेळी शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील काही मंडळीही होती. यावेळी त्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. परंतु, काल त्यांनी केंद्रात राज्यमंत्री पदाची शपथ घेताना घडलेल्या किस्स्याबाबत माहिती दिली. (Union Minister of State Dr. Bharti Pawar told the story of taking oath)
हेही वाचा – राज ठाकरेंना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने 2010 मधील ‘तो’ गुन्हा केला रद्द
याबाबत बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या की, कोरोना कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या एका बैठकीस मी गेले होते. तेव्हा तातडीचा दौरा म्हणून केवळ दोन साड्या नेल्या होत्या, एक साधी साडी नेसून मी बैठकीला गेले होते. पहिल्या टर्मची खासदार असल्याने मागच्या रांगेत बसले होते. या वेळी माझ्या हातात एक पत्र देण्यात आले. त्यात मी राज्यमंत्री म्हणून शपथ घ्यायाची असल्याने नमूद केले होते. ते पत्र वाचून माझा विश्वासच बसेना. मला आश्चर्याचा धक्काच बसला. आनंदही झाला. मी ते पत्र वारंवार वाचले.
यानंतर ते पत्र पतीला वाचायला दिले. तेव्हा कुठे विश्वास बसला. मी एवढ्या लवकर मंत्री होईन असे कधीच वाटले नव्हते. तसा दिल्लीतील राजकारणाचा फारसा अनुभवदेखील नव्हता. त्यामुळे शपथविधीपूर्वी, मंत्रिपदाची शपथ कशी घ्यायची?, प्रोटोकॉल काय असतात? हे समजून घेत मी दोन तास शपथ घेण्याचा सराव केला, असा किस्सा त्यांच्याकडून सांगण्यात आला. मात्र, राज्यमंत्री झाल्यावर मी आत्मविश्वासाने कामाला लागले. केंद्रीय मंत्रिमंडळात काम करताना राष्ट्रभक्ती आणि समर्पणाची भावना मनात ठेवून काम करते आहे. सध्यादेखील आरोग्यविषयक सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे आहे, असेही डॉ. भारती पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
यावेळी मंत्री पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीम त्यावेळी नवी होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांकडून तयारी करून घेणारे, सहकाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणारे असे आहेत. पंतप्रधान आमचे म्हणणे ऐकून घेतात. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे आणि शिकायला मिळणे हे आमचे भाग्यच आहे. तसेच, आरोग्य विभागाचे कॅबिनेट मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वातदेखील खूप काही शिकायला मिळाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.