घरमहाराष्ट्रपुण्यातील गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन

पुण्यातील गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन

Subscribe

पुणे : दोंदे गावात हिंदू-मुस्लिम कुटुंबांचा एकत्रित सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे. मुख्य म्हणजे मशिदीच्या समोर मंडप टाकून गणपतीची प्रतिष्ठापना करणे ते सत्यनारायणाच्या महापूजेसहित दहा दिवसांचा गणेशोत्सवातील सर्व खर्च आळीतील एक मुस्लिम तरुण उत्स्फुर्तपणे करीत आहे.

दोन्ही समाजातील मंडळी सहभागी होतात

दोंदेच्या गावठाणात सुकाळे आळीमधील हिंदू-मुस्लिम कुटुंब एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. एकता ग्रुप हिंदू-मुस्लिम यंग फ्रेंडशिप सर्कल असे या गणेशोत्सव मंडळाचे नाव आहे. मंडळाच्या अध्यक्षपदाचा मान दिव्या अंगद सुकाळे या हिंदू युवतीकडे तर उपाध्यक्ष पदाचा मान बशीरभाई गुलाब इनामदार या मुस्लिम तरुणांकडे सोपवण्यात आला आहे. दोन्ही समाजाची मंडळी सहभागी होऊन एकत्रित गणेशोत्सव साजरा करीत धार्मिक सहिष्णुतेचे दर्शन घडवीत आहेत. हा गणेशोत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी दोन्ही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे.

- Advertisement -

मशिदीसमोर गणेश मंडप

अनेक वेळा एकमेकांच्या धार्मिक स्थळांसमोरून वाजत गाजत मिरवणूक नेण्यास मनाई केली जाते. परंतु या ठिकाणी दोन्ही समाज बांधवांच्या सहमतीने येथील मशिदीसमोर गणेशोत्सवाचा मंडप उभारला आहे. या गणेशोत्सवातील दररोजच्या दोन वेळच्या श्रींच्या आरतीसाठी हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम बांधव सहभागी होत आहेत. इतर लहान -मोठ्या कामासाठी दोन्ही समाजातील बांधव एकमेकांना तत्परतेने मदत करीत आहेत.

महापुजेनिमित्त गावजेवण

गणेशोत्सव मंडळाची सत्यनारायणाची महापूजेसाठी गावजेवणाचा बेत ठेवला होता. याचा अन्नप्रसाद तसेच सत्यनारायणाच्या पूजेचा महाप्रसाद मशिदीमध्ये शिजवण्यात आला होता. हा प्रसाद तयार करण्यासाठी आळीतील मुस्लिम कुटुंबातील लहान-मोठ्यांसहीत महिला सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. मुख्य म्हणजे या सार्वजनिक गणेशोत्सवात येणारा दहा दिवसांतील खर्चाचा सर्व भार बशीरभाई इनामदार या मुस्लिम तरुणाने उचलला आहे. श्रींची मूर्ती खरेदी करण्यापासून मंडप, आरास तयार करण्यापर्यंत ते सोमवारी झालेल्या सत्यनारायणाच्या महापूजेपर्यंतचा सर्व खर्च इनामदार यांनी स्वतःच्या खिशातून केला आहे.

- Advertisement -

हिंदू-मुस्लिम कार्यकर्ते

सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त ग्रामस्थांच्या भोजन आणि अन्नप्रसादाची सोयसुध्दा त्यांनी केली होती. हा महाप्रसाद शिजवण्यासाठी ते स्वतः मदत करत होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी साहिल शेख, मदिना शेख, अंगद सुकाळे, मनोज बारणे, सलीम सय्यद, दिलशाद इनामदार, तुषार सुकाळे, शरद सुकाळे, नितीन सुकाळे, मयुरी सुकाळे, अवधूत बारणे यांनी पुढाकार घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -