घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये रंगला अनोखा "मासिक पाळी महोत्सव"

नाशिकमध्ये रंगला अनोखा “मासिक पाळी महोत्सव”

Subscribe

चांदगुडे परिवाराचे ऐतिहासिक पाऊल, समाजातील बुरसट विचार दूर व्हावे ही भावना

नाशिक : गेल्या आठवड्यात त्रंबकेश्वर येथील एका आश्रमशाळेत विद्यार्थिनीला मासिक पाळी आली म्हणून वृक्षारोपण करू दिले नव्हते. त्यातून मोठा वादंग निर्माण होऊन हा विषय राज्यभर चर्चिला गेला. त्यावर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच आपल्या नाशिकमध्ये गुरुवारी (दि. ४) एक अनोखा महोत्सव पार पडला. चांदगुडे परिवाराने आपल्या लाडक्या कन्येची प्रथम मासिक पाळी अगदी उत्साहात साजरी केली. अंनिसचे कार्यकर्ते असलेले कृष्णा चांदगुडे यांची मुलगी यशदा हिच्या प्रथम मासिक पाळीचा हा महोत्सव शहरातील एका हॉटेलात मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील मासिक पाळीबद्दलच्या बुरसट कल्पना, विचार गळून पडावे, नवीन आदर्श उभा रहावा यासाठीच हा महोत्सव आयोजित केल्याचे यावेळी चांदगुडे परिवाराने सांगितले.

दरम्यान, ’आता माझी पाळी, मीच देते टाळी’ या घोषवाक्यांतर्गत उपक्रम राबवला गेला. सुरूवातीला यशदाचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर मासिक पाळी या विषयावर समाजबंध संस्थेचे कल्पेश जाधव यांनी व्याखानातून जनजागरण केले. या विषयाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा यासाठी या महोत्सवात ‘कोष’ हा लघूपट दाखवला गेला. मासिक पाळी या विषयावर संदेश देणारी गाणी व कविता यावेळी म्हटल्या गेल्या. संत वाङ्मयातील रचनांमध्ये सापडणार्‍या अभंगांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. महिला व पुरुषांचा मासिक पाळी या विषयावर चर्चासत्र झाले. यात डॉ. टी.आर. गोराणे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, जयश्री पाटील, अ‍ॅड. विद्या चांदगुडे, प्रथमेश वर्दे आदींनी सहभाग नोंदवला. यावेळी मासिक पाळी या विषयावर असलेली प-पाळीचा ही पुस्तिका वितरीत केल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.
सूत्रसंचालन किरण चांदगुडे यांनी केले. तर आभार यांनी अ‍ॅड. समीर शिंदे यांनी मानले. स्नेहजनांना भेट स्वरूपात सॅनेटरी पॅड आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सॅनेटरी पॅडचे गरजू मुलींना वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक केले जात आहे. चांदगुडे परिवाराचे हे पाऊल नक्कीच ऐतिहासिक ठरेल. मासिक पाळीबद्दलचे बुरसट विचार मिटवण्याची ही मुहूर्तमेढ आहे अश्या भावना सर्वच स्तरेतून व्यक्त केल्या जात आहे.

मासिक पाळीबाबत भारतातच नव्हे तर जगभर मोठी अंधश्रद्धा आहे. त्यासाठी कार्यकर्ते काम करतच असतात परंतु त्याला कृतीची जोड हवी होती. योगायोगाने माझ्या मुलीला २ दिवसांपूर्वीच प्रथम मासिक पाळी आली आणि याच संधीच सोनं करण्याचं आम्ही ठरवलं. राज्यात हा विषय चर्चिला जात असताना त्याला कृतीची जोड हवी म्हणून आम्ही हा महोत्सव आयोजित केला. : कृष्णा चांदगुडे, अंनिस, राज्य कार्यवाह 

सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रातून माझ्यावर जो अभिनंदनाचा वर्षात होतोय त्याबद्दल धन्यवाद. हा कार्यक्रम करण्याची माझ्या आई-वडिलांची खूप इच्छा होती. खरंतर मासिक पाळी या विषयाला दुर्लक्षीत केलं जातं, त्याबद्दल बोललं जातं नाही, तुच्छतेची वागणूक दिली जाते. परंतु असं न करता त्याबद्दल चर्चा केली पाहिजे. : कु. यशदा चांदगुडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -