नाशिक : इंडिया आघाडीचा भाजपने धसका घेतला आहे. आगामी काळात इंडिया आघाडीचे सरकार येईल. आघाडीचे सरकार सर्वधर्म समभावाचे सरकार असेल. इंडिया व भारत असा वाद निर्माण केला जात आहे. आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. लवकरच राजकीय परिस्थिती पाहून जागावाटप केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांनी गुरुवारी (दि.७) काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हांडोरे म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेस एक वर्ष पूर्ण झाले आहे. या यात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी केले. या यात्रेमध्ये ३ हजार ५७० किलोमीटरचे अंतर पायी पार करण्यात आले. या यात्रेमुळे खासदार राहुल गांधी यांची छबी बदलली. ते परिपक्व नेते म्हणून समोर आले आहेत. या यात्रेनिमित्त देशभर शहर, तालुका, जिल्हा व राज्यनिहाय पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात राज्य अध्यक्ष नाना पटोले यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
केंद्रातील भाजप सरकारकडून संविधानाची तोडफोड केली जात आहे. स्वायत्त असलेल्या संस्थांवर नियंत्रण ठेवले जात आहे. जाती, धर्माच्या नावाखाली भांडणे लावली जात आहेत. देशाला लोकशाही चौकटीत आणले पाहिजे. भारतात शांतता व सदभावना निर्माण झाली पाहिजे. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे. भारतात तेढ निर्माण न करता सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले पाहिजे.
महाराष्ट्रातील जनता राजकारणाला वैतागली आहे. पैसे देवून सरकार पाडले जात आहे. हे सर्व जनतेला माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आल्यास इंडिया आघाडीकडून स्विकारला जाईल. अद्यापपावेतो जागावाटप ठरलेले नाही. राजकीय परिस्थिती पाहून जागावाटप केले जाईल. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षणामुळे आर्थिक पाठबळ मिळेल व गरीब व्यक्ती शिक्षित होईल. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता घटनेनुसार आरक्षण दिले पाहिजे.
यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नाशिक शहर अध्यक्ष आकाश छाजेड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुसरी भारत जोडो यात्रा गुजरात ते नागालॅण्ड
भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांच्याकडे नागरिकांनी अनेक प्रश्न मांडले. त्यावर खासदार राहुल गांधी व काँग्रेस पक्षाने उपाययोजना केली. ही यात्रा यशस्वी झाल्याने भाजपचे धाबे दणाणले. आता लवकर गुजरात ते नागालॅण्ड दुसरी भारत जोडो यात्रा काढली जाणार आहे, असे चंद्रकांत हांडोरे यांनी सांगितले.
जागा वाटप दुय्यम मुद्दा
राजकारण सर्व पक्ष होरपळून निघाले आहेत. भाजला सत्तेपासून दूर ठेवणे हा एकमेव आघाडीतील पक्षांचा अजेंडा आहे. इंडीया आघाडीमध्ये जागा वाटप हा दुय्यम मुद्दा आहे. राजकीय परिस्थिती पाहून जागावाटप वरिष्ठ नेते करतील, असे चंद्रकांत हांडोरे यांनी सांगितले.