संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या नमो 11 कलमी कार्यक्रम म्हणजे बोलघेवडेपणा आहे. राज्य सरकारकडून पंतप्रधान मोदी यांचे अवास्तव उदात्तीकरण सुरू असल्याची जोरदार टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
हेही वाचा – Parliament Special Session : प्रबळ विरोधकांना ईडीमार्फत कमकुवत करण्याचा प्रयत्न; सरकारवर आरोप
मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना या महाविकास आघाडी आणि काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सुरू होत्या. त्या योजनांचे फक्त नामांतर करण्यात आले असून या योजनांमध्ये सामान्य व गरीब लोकांच्या विकासासाठी कोणत्याही वेगळ्या तरतुदी करण्यात आल्या नसल्याचा दावा दानवे यांनी केला.
नमो महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत 73 लाख महिलांना विविध योजनांचे लाभ देण्याचे शासनाने ठरविले आहे. परंतु प्रत्यक्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रमोद महाजन महिला कौशल्य योजना यापूर्वी सुरू होती. तसेच 73 हजार शेततळे उभारण्यात येणार आहेत, यापूर्वीसुद्धा मागेल त्याला शेततळे योजना सुरू होती. त्यामुळे सरकारने फक्त ही अकरा कलमी योजना घोषित करून बोलघेवडेपणा केला असल्याचे दानवे म्हटले आहे.
देशात यूपीएचे सरकार असताना गांधी घराण्यातील विविध व्यक्तींच्या नावे सुरू करण्यात आलेल्या योजनांवरती सध्याच्या केंद्रातील भाजपाप्रणित सरकारने आक्षेप घेतलेले आहेत. जर काँग्रेसच्या काळामध्ये शासकीय योजनांना व्यक्तीचे नावे देणे अयोग्य ठरत असेल तर, तोच न्याय भारतीय जनता पक्षाला सुद्धा लागू होतो. सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
तब्बल 54 हजार बांधकाम कामगारांनी शासकीय योजनेच्या लाभासाठी केलेल्या अर्जांपैकी 13 हजार बांधकाम कामगारांना मार्च 2023पर्यंत मदत मिळाली नाही. त्यामुळे नमो कामगार कल्याण अभियानाअंतर्गत संच वाटप हा कार्यक्रम 73 हजार बांधकाम कामगारांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप दानवे यांनी केला.