राज्यात अवकाळी पावसाचा कहर; मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान, शेकडो पोपट मृत्यूमुखी!

unseasonal rain in maharashtra
राज्यात अवकाळी पावसाचा कहर; मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान, शेकडो पोपट मृत्यूमुखी!

राज्यात सध्या कोरोनाचा संकट गडद होताना दिसत आहे. पण दुसरीकडे अवकाळी पावसामुळे राज्यासमोर दुसरे संकट उभे असल्याचे दिसत आहे. राज्यातील काल (रविवार) काही भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास अवकाळी पावसामुळे गेल्यामुळे बळीराजा हवलादिल झाला आहे. आज देखील राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रब्बी पिकांना बसणार मोठा फटका

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडला. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसणार आहे. अनेक गावातल्या आठवडी बाजारांवर याचा परिणाम झाला आहे.

धुळे जिल्ह्यातील पिकांचे झाले अतोनात नुकसान

काल (रविवार) अचानक संध्याकाळी धुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कांदा, शेवगा, हरभरे, गहू, बाजारी आणि टोमॅटोसारख्या काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे आर्णी शिवारात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवलादिल झाला आहे. नुकसानग्रस्त पिकांची लवकरात लवकर पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी विभागाला केली आहे.

अमरावतीत शेतकऱ्यांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान

सलग चार दिवस अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे काल दुपारी गारपीटीसह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

अचानक अवकाळी पावसामुळे निष्पाप पोपटांचा बळी

डोणगाव परिसरामध्ये अवकाळी गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. रात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे डोणगाव परिसरातील निष्पाण शेकडो पोपटांचा मृत्यू झाला आहे. यात असंख्य पक्षी बळी पडले आहेत. डोणगावच्या बस स्टँडच्या येथे पिंपळाचे मोठे झाड आहे. त्यावर नेहमी हजारो पोपट बसतात. पण रात्री झालेल्या अचानक गारपिटीमुळे शेकडो पोपट गारीचा मार लागून मृत्यूमुखी पडले.


हेही वाचा – सोयाबीन उत्पादकांना दिलासा, एक क्विंटला मिळतोय ५ हजारांचा दर