Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अवकाळी पावसाचा राज्याला मोठा फटका

अवकाळी पावसाचा राज्याला मोठा फटका

मुंबईत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. अचानक पडलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Related Story

- Advertisement -

हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला गुरुवारी भल्या पहाटे आणि सकाळी अवकाळी पावसाने झोडपले. मुंबईलाही या अवकाळी पावसाने झोडपले. गुरुवारी संध्याकाळी उशिराने नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आदी परिसरात काहीसा मुसळधार पाऊस पडला. तर मुंबईत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. अचानक पडलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबईतील वरळी, जोगेश्वरी, चेंबूर, मालाड आदी परिसरात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. तर मुलुंड, घाटकोपर परिसरात काहीसा वाऱ्याचा जोर वाढल्याचे सांगण्यात आले.

वादळी वाऱ्यामुळे हार्बर लाईनही विस्कळीत

गुरुवारी मुंबईतील अनेक भागात अचानक पाऊस सुरु झाला. वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील अनेक भागात मोठे नुकसान झालेले पहायला मिळाले. वादळी वाऱ्यामुळे हार्बर लाईनही विस्कळीत झाली. ओव्हरहेड वायर्समध्ये घर्षण होऊन अनेक ठिकाणी स्पार्किंग सुरु झाले आहे. त्यामुळे वाशी पासून पुढील काही स्थानकात वाहतूक विस्कळीत झाले आहे. वाशी ते पनवेल स्थानकादरम्यान अनेक लोकल उभ्या आहेत. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला पहायला मिळत आहे. हार्बरच्या मानसरोवर स्थानकात ओव्हर हेड वायर्समध्ये काही तांत्रिक कारणांमुळे बिघाड आला होता. अचानक पाऊस सुरु झाल्याने ओव्हर हेड वायर्सचे घर्षण होऊन स्पार्किंग सुरु झाले त्यामुळे हार्बर मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. हार्बर लाईनवर गुरुवारी रात्री ८:१० मिनिटांपासून लोकल ठप्प झाल्या होत्या. मात्र पुढील एका तासातच हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. त्यानंतर हार्बरवरील वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मात्र लोकल गाड्या या जवळपास अर्धातास उशिराने धावत आहेत. ठप्प झालेल्या लोकलमुळे प्रवाशांचे मोठा खोळंबा झाला. हार्बर लाईनच्या सर्व स्थानकांवर प्रवशांची मोठी गर्दीही पहायला मिळत आहे.

कोकणात गारांसह तुफान पाऊस

- Advertisement -

कोकणात विशेषत: रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांसह तुफान पाऊस पडला. गुरुवारी सकाळी सिंधुदुर्गातील अनेक तालुक्यांमध्ये गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याचा मोहोर गळून पडला. रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गारा पडल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. तर सांगलीतल्या अवकाळीच्या धुमाकुळाने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. अनेक भागांमधील द्राक्षाची निर्यात झाली नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत आहे. तिकडे परभणीतल्या पावसाने ज्वारी, हरभरासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

परभणीतही जोरदार पाऊस

परभणी जिल्ह्यात बुधवारी रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. परभणी, पोखर्णी, दैठणा या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यातल्या उपळा गावासह काही भागात रात्री साडे आठनंतर पावसाचा शिडकावा झाला.

उस्मानाबादमध्ये ढगाळ वातावरण 

- Advertisement -

उस्मानाबाद शहर आणि परिसरामध्ये काल ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट, तेल्हारा भागात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी बरसणार्‍या पावसामुळे शेतकर्‍याची चिंता वाढली आहे. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली.

कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बागलाण तालुक्यातील अंतापूर परिसरात गुरुवारी पाच वाजता अचानक वादळी वार्‍यासह गारपिटीचा पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याची पात पूर्णत: भुईसपाट झाली आहे. वादळी वार्‍यासह जोरदार गारपीट व पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. हजारो हेक्टरवरील रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरबरा, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


हेही वाचा – वादळी वाऱ्यामुळे हार्बर लाईन विस्कळीत

- Advertisement -