घरमहाराष्ट्रउर्फी प्रकरण चित्रा वाघ यांच्या अंगलट; राज्य महिला आयोगाकडून नोटीस

उर्फी प्रकरण चित्रा वाघ यांच्या अंगलट; राज्य महिला आयोगाकडून नोटीस

Subscribe

मॉडेल उर्फी जावेद हिच्या पेहरावावरून सातत्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला लक्ष्य करणार्‍या भाजप महिला मोर्चाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आयोगावर खोटे आरोप केल्याचे म्हणत महिला आयोगाने वाघ यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीला २ दिवसात उत्तर न दिल्यास वाघ यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी दिली.

महिला आयोग अभिनेत्री तेजस्विनी पंडितला अनुराधा वेबसीरिजच्या पोस्टरवरून नोटीस पाठवू शकते, मात्र भरस्त्यात नंगानाच करणार्‍या मॉडेलला नोटीस पाठवत नाही, असा आरोप चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यावर अनुराधा वेबसीरिजच्या पोस्टरवरून राज्य महिला आयोगाने तेजस्विनी पंडितला कोणतीही नोटीस पाठवली नाही. आम्हाला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही अनुराधा वेबसीरिजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर संजय जाधव यांनी आयोगाला त्या संबंधित उत्तर दिले. यात कुठेही तेजस्विनी पंडितचा उल्लेख नव्हता, परंतु चित्रा वाघ यांनी माध्यमांना खोटी माहिती दिली. त्यामुळे स्वत:च्या प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करणार्‍या चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटीस बजावली आहे, अशी माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली.

- Advertisement -

भारतीय संविधानाने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे उर्फी जावेदचे समर्थन कोण करते, कोण नाही याबाबत बोलायचा अधिकार चित्रा वाघ यांना नाही. त्यांनी नको त्या ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा महत्त्वाच्या मुद्यांवर बोलले पाहिजे. महाराष्ट्रात रोज ३४ मुली बेपत्ता होत असल्याच्या तक्रारी येतात. त्यावर चित्रा वाघ यांनी बोलले पाहिजे. ओमानमध्ये पुण्यातील अनेक महिला अडकल्या आहेत. हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने महिला आयोग काम करीत आहे, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करीत फिरतेय तिला नोटीस द्यायला हवी, तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरू राहणार.
-चित्रा वाघ, अध्यक्षा, भाजप महिला मोर्चा

- Advertisement -

महिला आयोग गेल्या ३० वर्षांपासून काम करीत आहे. आयोगाची प्रतिमा मोठी आहे. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी महिला आयोगासाठी काम केले आहे. त्यामुळे स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आणि आकसापोटी आयोगावर केलेल्या आरोपामुळे चित्रा वाघ यांना नोटीस बजावल्याचे चाकणकर यांनी सांगितले.ही नोटीस मेलद्वारे पाठवली असून याप्रकरणी दोन दिवसात स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून आयोग एकतर्फी कार्यवाही करेल. –   – रुपाली चाकणकर , अध्यक्षा , राज्य महिला आयोग 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -