चित्रा वाघ यांच्यामुळे माझ्यावर हल्ला होऊ शकतो; उर्फी जावेदची महिला आयोगाकडे तक्रार

urfi javed complaint against bjp leader chitra wagh women commission

अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवर घेतलेल्या आक्षेपामुळे या वादाला सुरुवात झाली. यानंतर चित्रा वाघ यांनी सार्वजनिक ठिकाणी अंगभर कपडे घालण्याचा सल्ला तिला दिला, मात्र यानंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये ट्विट वॉर सुरुच आहे. अशात उर्फी जावेदने महाराष्ट्र महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्याविरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे.

या तक्रार अर्जात उर्फीने म्हटले की, मी फॅशन इंडस्ट्रीमधून असल्यामुळे माझं असं राहणे आणि दिसणे ही व्यवसायाची गरज आहे. मात्र चित्रा वाघ यांनी मला मारण्य़ाची धमकी दिली आहे. चित्रा वाघ या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वाटत आहे.

उर्फीने पुढे म्हटले की, चित्रा वाघ यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. चित्रा वाघ गेल्या अनेक दिवसांपासून मला उघडपणे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला सुरक्षा मिळावी, अशी मागणी उर्फीने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे.

दरम्यान पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानंतर काल (शनिवारी) उर्फी जावेद हिची चौकशी झाली. जवळपास दोन तास पोलीस तिची चौकशी करत होते. माझ्या आवडीचे कपडे घालण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. मी भारतीय नागरिक आहे. हा अधिकार मला संविधानाने दिला आहे. मी माझ्या आवडीचे आणि व्यावसायिक गरजेनुसार कपडे घालते. छायाचित्रकार माझे फोटो काढतात. त्यातील काही फोटो व्हायरल होतात. व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवू शकते?’ असा प्रश्न उर्फीने जबाबावेळी उपस्थित केला.

उर्फीने दिलेला तक्रार अर्ज

मी उर्फी जावेद, खूप दिवसांपासून मनोरंजन उद्योगात काम करत आहे. मनोरंजन उद्योग ग्लॅमरस राहण्याची आवश्यकता असते. यासोबत मी अभिनय, संगीत, व्हिडिओ आणि फॅशनच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. माझ्याशी किंवा माझ्या भूतकाळाशी कोणताही संबंध नसलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माझ्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. तोकडे कपडे घालत असल्याचा आरोप करत त्यांनी माझ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पण, सुदैवाने भारतात असा कोणताही कायदा नाही की मी विशिष्ट प्रकारचे कपडे घालू शकत नाही आणि बाहेर जाऊ शकत नाही. मला जे वाटेल ते घालण्याचे स्वातंत्र्य आहे. असे कपडे घालून मी कोणाचे कोणतेही नुकसान करत नाही.

प्रसिद्धी किंवा राजकीय कारणांसाठी माझ्या विरोधात केलेल्या तक्रारी आणि पत्रकार परिषदांमुळे मला नैराश्य आले आहे. तसेच, काही काळापासून असुरक्षित वाटू लागले आहे. चित्रा वाघ यांनी मला जाहीरपणे मारण्याची धमकी दिली आहे. जेव्हा उर्फीला मारेल तेव्हा थोबाडीत मारेल, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. चित्रा वाघ या राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्याने लोक असे करण्यास धजावू शकतात. तसेच, मला कोणतीही सुरक्षा नसल्याने घराबाहेर पडताना तसेच, घरी असतानाही मला असुरक्षित वाटते. हे घडण्यापूर्वी मला मुंबईत इतके असुरक्षित वाटले नव्हते. माझ्या जीवाला धोका आहे. मी तुम्हाला विनंती करतो की सुरक्षेच्या कारणास्तव मला सुरक्षा द्या.


नाशिक पदवीधरसाठी भाजपचा तांबेंना की शुभांगी पाटलांना पाठिंबा?; बावनकुळे म्हणाले…