मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी; उर्फी जावेदने महिला आयोगाकडे पाठवलं पत्र

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट केले आहे. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये सोशल मीडियावरून शाब्दिक वाद सुरु आहेत. शुक्रवारी उर्फीने महिला आयोगाकडे धाव घेत चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. अशातच आता उर्फीने राज्य महिला आयोगाला पत्र पाठवून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. या पत्रामध्ये उर्फीने चित्रा वाघ यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा देखील उल्लेख केला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्वीटरवरुन माहिती दिली आहे. तसेच यावर मुंबई पोलिस आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

रुपाली चाकणकरांचे ट्वीट चर्चेत

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्वीटर अकाऊंटवरुन उर्फीच्या पत्राबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी पत्राचा फोटो शेअर करत लिहिलंय की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,”मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून श्रीमती चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता किंवा वैयक्तिक प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या आहेत, सबब माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वातावरण निर्माण होऊन मला मुक्तपणे वावरता येत नाही.म्हणून मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी.” असं पत्रात उर्फीने म्हटल्याचं चाकणकरांनी सांगितले आहे.

पुढे चाकणकरांनी मुंबई पोलिस आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात त्यांनी लिहिलंय की,”मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे , महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा.” असं रुपाली चाकणकरांकडून नमूद करण्यात आलंय.

 


हेही वाचा :

सिन्नर तालुक्यातील तहसीलदारांकडून ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस